महिला आयोगाकडून उद्या 'प्रज्ज्वला' चे प्रशिक्षण गडचिरोलीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘प्रज्वला’ योजना राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम  उद्या २८ ऑगस्ट रोजी  अहेरी व गडचिरोली येथे होणार आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा   विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
"राज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. प्रज्वला योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात ‘एक जिल्हा, एक वस्तु’ असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत.  त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.  तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी ‘बचत गट बाजार’ जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे’’, अशी माहिती आयोगाच्या  अध्यक्षा रहाटकर यांनी दिली.
या योजनेसाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री  पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. 
आतापर्यंत प्रज्वला प्रशिक्षण कार्यक्रम नंदुरबार, धुळे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, नांदेड, परभणी, जळगाव, अकोला, वाशीम, पालघर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, लातुर, सोलापुर, बीड, मुंबई या जिल्ह्यात झाले आहेत.       Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-27


Related Photos