पेंढरी येथे गडचिरोली पोलिस दलातर्फे आरोग्य शिबिर : १७७ नागरिकांची तपासणी


- पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद यांचा संयुक्त उपक्रम; ३६ नागरिकांना पुढील उपचारासाठी शिफारस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा पेंढरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात उपपोलीस ठाणे पेंढरीच्या हद्दीतील १७७ नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.
अतिदुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांबाबत जागरूक करणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे तसेच आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देणे, या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.
तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी -
शिबिरात पोलीस रुग्णालय गडचिरोलीच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया कुमरे आणि डॉ. रोशन गिरसावळे, औषधी निर्माण अधिकारी प्रकाश दानव तसेच अधिपरिचारिका जयमाला लाटीलवार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान नागरिकांना त्यांच्या आजारानुसार आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. विविध आजार, आरोग्यविषयक समस्या आणि पोषणाशी संबंधित बाबींवर नागरिकांना मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या १७७ नागरिकांपैकी ३६ नागरिकांना पुढील तपासणी व उपचारांसाठी संबंधित रुग्णालयांमध्ये जाण्याची शिफारस करण्यात आली.
आरोग्य सेवेच्या माध्यमातून पोलिसांचा जनतेशी संवाद -
गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. विशेषतः जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मेळावे व तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
सन २०२१ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने २२२ आरोग्य मेळावे घेण्यात आले असून, त्यामधून जवळपास ५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
याशिवाय पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६ रक्तदान शिबिरांमधून ४ हजार ८६४ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून ९ हजार ९७१ हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १ हजार ४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शहीद जवानांचे बलिदान आणि सी-६०च्या शौर्याची माहिती -
आरोग्य शिबिराच्या निमित्ताने नागरिकांना आरोग्य सेवेसोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यासाठी फिरत्या प्रदर्शनाचा आणि विविध माहितीपर बॅनरचा वापर करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या माध्यमातून पोलीस दलाच्या कार्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासोबतच पोलिसांचे सामाजिक कार्य आणि जनहिताचे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन -
या आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच सहायक पोलीस अधीक्षक, पेंढरी कॅम्प कारवाफा सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उपपोलीस ठाणे पेंढरीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप ताराम आणि पोलीस अंमलदारांनी शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. वैद्यकीय पथक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.




Petrol Price




