गडचिरोली जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल : ना. देवेंद्र फडणवीस


- पत्रकार परिषदेतून दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने अनेक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प मार्गी लावून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली येथे आले असता आज ५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री ना. डाॅ. परिणय फुके, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर, आ. डाॅ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे आदी उपस्थित होेते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्पावर आधारीत कोनसरी येथे उभारला जाणारा लोहप्रकल्प महत्वाचा प्रकल्प आहे. या ठिकाणी सबंधित कंपनी लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करणार असून राज्य सरकार संपूर्ण प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करून आहे. हा प्रकल्प उतिशय उत्तमरीत्या सुरू होईल आणि यशस्वी होईल. यामुळे जिल्ह्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. रेल्वे संदर्भातील अडथळे दूर करण्यातही सरकारला यश आले आहे. यामुळे लवकरच रेल्वेचा प्रकल्पही पूर्णत्वास येईल. रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून महामार्गांचे काम सुरू आहे. पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. काही लहान पुलांचे काम प्रस्तावित असून कामांना मंजूरी दिलेली आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात संपर्क खंडीत होणार्या मार्गांचा प्रश्न  मोठ्या पुलांच्या निर्मितीमुळे मिटणार आहे.
जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रश्न आहे. मात्र मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात पोलिस विभागाने उत्तम मोहिम राबवून नक्षलवादावर वचक मिळाला आहे. मध्यंतरी काही घटना घडल्या. त्याबद्दल सरकार गंभीरतेने निर्णय घेत आहे. पोलिस दलाने निर्णायक लढाई लढल्यामुळे मोठ्या कॅडरचे नक्षली मारल्या गेले आहेत, काहींना अटक करण्यात आली आहे तर अनेक नक्षली आत्मसमर्पण करीत आहेत. पोलिस दलाला अजून चांगल्या प्रकारे कारवाई करता यावी याकरीता शासन आवश्यक सोयी - सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेत आहे, असेही ना. फडणवीस म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न मिटविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. तलाव, विहीरींची संख्या अधिक असल्यामुळे मोठा प्रकल्प निर्माण करता येणार नाही. मात्र अनेक छोट्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात धडक सिंचन विहीरींचा कार्यक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून १० हजार सिंचन विहीरी मंजूर करण्यात आल्या. यापैकी २ हजार १०० विहीरी पूर्ण झाल्या आहेत तर ४ ते ५  हजार विहीरींचे काम प्रगतीपथावर आहे. विहीरीसोबतच पंप आणि विजजोडणीसुध्दा दिली जात आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख सोलर पंप देण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहणार नाही.
सध्या राज्यात अतिवृष्टी होत असून अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये अनेक गावे पुराने वेढले आहेत. या ठिकाणी एनडीआरएफ, नेव्ही, वायुदल आणि स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रशासन आणि सरकार संपूर्ण पुरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दररोज सर्व जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांकडून पुरपरिस्थितीचा मी स्वतः आढावा घेत आहे. राज्यातील काही भागात पाउस पडत नव्हता. यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढाणार अशी स्थिती होती. मात्र सर्वत्र पाउस पडत असल्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट टळले आहे, गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्क्यांच्या जवळपास पाउस कोसळला आहे, अशीही माहिती ना. फडणवीस यांनी दिली.
जिल्ह्यातील ओबीसींचा प्रश्न काॅंग्रेस, राकाॅंच्या काळातील आहे. काॅंग्रेस सरकारने ओबीसींचे आरक्षण कमी करून ६ टक्क्यांवर आणले. आमचे सरकार ओबीसींचे आरक्षण कसे वाढविता येईल यावर विचारविनिमय करीत आहे. मराठा समाजाचे आरक्षण ओबीसींना देता येणार नाही मात्र ओबीसींचे आरक्षण कसे वाढविता येईल याबाबत सरकार सकारात्मक आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीचा प्रश्न मिटविला जाईल, उद्योजकांना कमी दरात भूखंड उपलब्ध करून दिले जातील. मेडीगट्टा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बुडीत क्षेत्र अधिग्रहीत केल्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच या प्रकल्पातून पाईपलाईनद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशीही माहिती पत्रकारांना उत्तर देताना ना. फडणवीस यांनी दिली. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-05


Related Photos