महत्वाच्या बातम्या

 पंचनामे झाल्यावरच शेतकऱ्यांना मदत : उपमुख्यमंत्री अजित पवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पीकपाहणी केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून गतीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कापूस, धान, तूर यांच्या नुकसानीचे आकडे पंचनामे पूर्ण केल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सध्या राज्यात कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलचा मुद्दा पेटलेला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कांदाप्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी भेटले आहेत. तर इथेनॉल संदर्भात मी स्वत: काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. आता हा प्रश्न दिल्लीस्तरावर असल्याने केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांशी भेट घ्यावी लागणार आहे. त्यानुसार, सभागृह सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकून आम्ही दिल्लीला जाऊ आणि यावर तोडगा काढू. पुरवणी मागण्यांमध्ये ४० हजार कोटींचा निधी सत्ताधारी आमदारांना दिल्याची टीका विरोधीपक्ष करत आहे. ती टीका तथ्यहीन असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

सध्या मंत्रिमंडळ विस्तार नाही : 
सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न नाही. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना मदत करणे, कांदाप्रश्न आणि इथेनॉलचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांना सरकारचे प्राधान्य राहणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यावर ते जेव्हा निर्णय घेतील तेव्हा विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

टिकणारे मराठा आरक्षण देणार : 
मराठा आरक्षण हे कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत असलेले आणि टिकणारे आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आणि टिकणारे मराठा आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos