पोलीस जवाना कडून विनयभंग झाल्याच्या प्रकरणात महिला आयोगाकडे मागितली दाद


- बयान योग्यरीतीने  नोंदवला नसल्याचा  पीडित महिलेचा आरोप 
- बयान परत नोंदवण्याची व  एफ. आय. आर. नव्याने नोंदवण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
सी - ६० पथकाचा जवान  मिथुन रासेकर यांच्याकडून कामगार महिलेचा विनयभंग झाल्याप्रकरणात "We 4 Change"  या संघटनेने  महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. बयान योग्यरीतीने  नोंदवले  नसल्याचा  आरोप  पीडित महिलेने केला असून नव्याने बयान नोंदवावे तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. 
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार  मलिक बुधवानी यांच्या श्री साई सिमेंट ब्रिक्स फॅक्टरी मध्ये काम करणारी महिला फॅक्टरी हद्दीतील नळावर  १५ जुलै रोजी  संध्याकाळी साडेसात वाजता पाणी भरत होती. त्यावेळी मिथुन नरेंद्र रासेकर हा   विशेष पोलिस पथकाचा जवान गाडीवर आला व तिला शरीर सुखाची मागणी करू लागला.  पीडित महिला मिथुन रासेकरना ओळखत नव्हती अनोळखी इसम शारीरिक लगट करण्यासाठी गाडीवरून उतरून ब्रिक फॅक्टरी च्या आवारात येतो, आपल्या जवळ येतो, आणि शरीर सुखाची मागणी करतो हे बघून त्या कामगार महिलेला धक्काच बसला. ती घाबरून पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याने तिचा  हात सुद्धा पकडला. मात्र जोरात झटका देऊन  तिने स्वतःची सोडवणूक करून घेतली. त्यावेळी घरी कोणी नसल्यामुळे  धावत मालकाच्या ऑफिसमध्ये गेली आणि मला वाचवा अशी विनंती करू लागली. फॅक्टरीचे मालक  मलिक बुधवानी जेव्हा काही कामगारांसह बाहेर येऊन मिथुन रासेकरला समजावण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्याने "मी पोलीस आहे, एस. पी. चा माणूस आहे तुम्ही माझे काही बिघडवू शकत नाही तुम्हाला काय करायचे करून घ्या" असे म्हणून  मालकाला व कामगारांना धमकावू लागला. या धमकावणीला घाबरून  मलिक बुधवानी यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस ताब्यात घेतात म्हटल्यावर मिथुन रासेकर घाबरला. पीडिता महिलेला "मला माफ कर, तुला एक लाख रुपये देतो" असे म्हणाला. पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिसस्टेशनमध्ये पीडित महिलेचे बयान नोंदवण्यात आले. F. I. R. मध्ये मिथुन रासेकर वर 509 हे सौम्य कलम लावले. तसेच मिथुन रासेकरला अटक करण्यात आली नाही किंवा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस या प्रकरणात C-60 च्या जवानाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. मिथुन रासेकर ऐवजी जर कोणी सामान्य नागरिकाने असा गुन्हा केला असता तर पोलिसांनी कडक कारवाई केली असती असे पीडित महिलेने म्हटले आहे.   व्यसनी जवानाला पाठीशी घालू नये तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी "We 4 Change" संघटना करीत आहे.   
आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिलेने   आरोपी मिथुन रासेकर तिची ओढणी ओढली, तिचा हात धरला व त्यामुळे ती भिऊन मालकाच्या ऑफिस कडे पळत गेली. परंतु गडचिरोली पोलिसांनी तिचे जे बयान घेतले त्यामध्ये ओढणी ओढण्याचा, हात धरण्याचा, उल्लेख नाही. तसेच विनयभंगाची कलमे सुद्धा लावलेली नाहीत, असा आरोप केला आहे. पीडित महिला ही छत्तीसगढी असल्याने व तिचे बयान मराठीत लिहिले गेल्याने तिला ते कळले नाही. त्याचप्रमाणे पोलिसांनी जे काही लिहिले असेल ते बरोबरच असेल असा विश्वास तिला वाटला. मात्र त्या बयानाचा अर्थ समजल्यानंतर आपल्यावर अन्याय झाला असे तिला वाटले. एफ. आय. आर. नव्याने  व अचूकपणे नोंदवला जावा, त्यात योग्य ती कलमे लावण्यात यावी अशी मागणी सुद्धा पीडित महिलेने केली आहे.
गडचिरोली शहरात आपले बयान योग्य पद्धतीने लिहिले जाणार नाही, त्याचप्रमाणे गडचिरोली शहरात आपल्याला न्याय सुद्धा मिळू शकणार नाही ही या भीतीने पीडित महिला नागपूर शहरात आलेली आहे. पीडित महिलेने "We 4 Change" या संघटनेशी संपर्क साधून पोलीस कशा पद्धतीने ही केस दाबू पाहतात आहेत हे सांगितले व मदत करण्याचे आवाहन केले. पीडित महिलेच्या विनंतीवरून संबंधित केस राष्ट्रीय महिला आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आलेली आहे. संघटनेने कुठलेही पाऊल उचलल्याआधी जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली त्याचप्रमाणे गडचिरोली नक्षल रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक   तांबडे यांच्याशी संपर्क साधून पीडित महिलेवर अन्याय होत असल्याची जाणीव त्यांना करून दिली होती परंतु त्यानंतर सुद्धा पीडित महिलेला दिलासा मिळाला नाही, असे संघटनेच्या समन्वयक प्रा. रश्मी पारसकर,  प्रा. दीपाली मेश्राम, डॉ. चित्रा तूर,  सुनयना अजात यांनी म्हटले आहे.  मिथुन रासेकर वर आयपीसी  ३५४ (विनयभंगाचा प्रयत्न) आयपीसी ४४१ (ट्रेसपासिंग),  आयपीसी  ५०३ (धमकवणे) हे कलम लावावे व त्याला त्वरित अटक करून निलंबित सुद्धा करण्यात यावे अशी मागणी   "We 4 Change" संघटनेने केली  आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-07-22


Related Photos