बालकांचे प्रश्न , तक्रारींचे निवारण करणे हा जनसुनावणीचा हेतू : डॉ.आनंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
बालकांच्या हक्कांच्या उल्लंघनविषयक तक्रारींची गंभीर दखल राष्ट्रीय बाल हक्क व  संरक्षण आयोग घेणार असून बालकांचे प्रश्न आणि तक्रारींचे तातडीने  निराकरण करणे हा जनसुनावणीचा हेतू आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे सदस्य डॉ.आर.जी.आनंद यांनी दिली. 
नागपुर विभागातील सहाही जिल्हयातील बाल हक्कांबाबत सुनावणी नवी दिल्ली येथील आयोगाचे सदस्य डॉ. आर.जी. आनंद यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनसुनावणी पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.आनंद बोलत होते.  यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्य बाल हक्क व संरक्षण अधिकारी  आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह विदर्भातील सहाही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक व आयोगाचे सदस्य  उपस्थित होते.
आयोगाने  आतापर्यंत तामीळनाडू, हिमाचलप्रदेश, अरुणाचलप्रदेश, मिझोराम, तेलंगणा, कर्नाटक व केरळ इत्यादी राज्यांमध्ये ८ जनसुनावणी घेतली आहे. ९ जनसुनावणी  गडचिरोली  येथे होत आहे.  मागील आठही जनसुनावणीमध्ये बहुतांश तक्रारी आरटीईसंदर्भात असून, आतापर्यंत एक हजारांहून अधिक तक्रारींचा निपटारा केल्याची माहिती डॉ.आनंद यांनी दिली. 
 अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे बालकांचे प्रश्न हाताळावे. सीपीसीआर ॲक्ट २००५ अन्वये खूप दिवसांपासून प्रलंबित असलेली बालकांच्या हक्कांविषयीच्या प्रकरणांचा ऑन स्पॉट निवाडा करण्याचे अधिकार आयोगाला असल्याचे   डॉ.आनंद म्हणाले. यावेळी पत्रकारांनी जिल्ह्यातील आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत चालविले जाणारे वसतिगृह , आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळांकडून मिळणारी वागणूक आदी विषयांवर प्रश्न उपस्थित केले. या सर्व बाबींची अयोग्य दाखल घेणार असल्याचे राज्य बाल हक्क व संरक्षण अधिकारी  आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे म्हणाले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-19


Related Photos