महत्वाच्या बातम्या

 विसापूर परिसरात शेतातील सोलर प्लेट, वायरची चोरी : २५ हजारांचा मुद्देमाल लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर परिसरातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी सोलर पंपाच्या चार प्लेट, वायर तसेच झटका मशीनची सोलर प्लेट असा अंदाजे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतमालक विशाल नामदेव घोरुडे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घोरुडे यांची विसापूर परिसरातील सर्वे क्रमांक ३११ मध्ये १.०१ हेक्टर शेती आहे. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत पीएम-कुसुम योजनेतून सन २०२३ मध्ये त्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यात आला होता.

या संचावर एकूण १४ सोलर प्लेट बसविण्यात आल्या होत्या. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता घोरुडे शेतात गेले असता सोलर पंप व प्लेट व्यवस्थित होत्या. मात्र, २२ ऑगस्ट रोजी पुन्हा शेतात गेल्यावर दोन सोलर प्लेट तसेच पंपाजवळील झटका मशीनची प्लेट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी पुन्हा दोन सोलर प्लेट आणि सोलर प्लेटपासून पाण्याच्या मोटारपंपापर्यंत जोडलेली सुमारे ६० फूट वायर चोरीला गेल्याचे आढळून आले.

चोरीस गेलेल्या चार सोलर प्लेटची अंदाजे किंमत २० हजार रुपये, वायरची किंमत दोन हजार रुपये, तर झटका मशीनच्या सोलर प्लेटची किंमत सुमारे तीन हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान, उर्वरित सोलर प्लेट आणि पाईपही चोरीला जाऊ नयेत म्हणून घोरुडे यांनी ते स्वतः काढून चंद्रपूर येथील आपल्या निवासस्थानी नेऊन ठेवले आहेत. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान रात्रीच्या वेळेत ही चोरी झाल्याचा संशय असून, बल्लारपूर पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






Related Photos