महत्वाच्या बातम्या

 शिक्षणाने अधिकाराचे भान येते : उपायुक्त सुरेंद्र पवार


- बार्टी उपकेंद्रतर्फे विद्यार्थी दिवस साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : बार्टी उपकेंद्र नागपूरतर्फे ७ नोव्हेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त भांडे चौक परिसरातील करिअर कॅम्पसमधे मला कळलेले शिक्षणाचे महत्त्व या विषयावर वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात करिअर कॅम्पस, पिरॅमिड ट्यूटोरियल, विलास अकॅडमीच्या एकूण १४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर बार्टी उपकेंद्र नागपूरचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक, करिअर कॅम्पसचे सुशांत भगत उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सुरेंद्र पवार यांनी उपस्थित विद्यार्थांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करण्यास सांगितले. शिक्षणाने अधिकाराचे भान येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी अनिल वाळके यांनी विद्यार्थांना बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तम विद्यार्थी होण्यास मार्गदर्शन केले. आजन्म विद्यार्थी राहण्याचे महत्त्व सांगितले.

मला कळलेले शिक्षणाचे महत्त्व हा विषय शैक्षणिक अनुभवाशी संबंधित असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवातून वक्तृत्व कथन केले. शिक्षण हे फक्त साक्षर होण्यासाठी नाही तर सुशिक्षीत होण्यासाठी आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट एक चांगला नागरीक घडवणे आहे. शिक्षणाने सहकार्याची जाणीव विकसित होते. अधिकाराचे भान येते. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे असे मत व्यक्त करीत बाबासाहेबांच्या दृष्टीकोनातून शिक्षणाचे महत्त्व उलगडले.

वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधून सिध्दी ठमके प्रथम, लुंबीनी कांबळे व्दीतीय, साहूरी गजभिये तृतीय क्रमांकाने विजयी ठरले. रोची सुलभेवार, साक्षी अघाव, आदीत्य पाटिल या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सुशांत भगत, करण बस्सी, कोमल ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल गडलिंग यांनी केले तर आभार सुनीता झाडे यांनी मानले.





  Print






News - Nagpur




Related Photos