गांधी जयंतीच्या ड्राय डे दिवशी बल्लारपुरात बार सुरू : १८ जणांसह बारमालक, मॅनेजरवर गुन्हा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर अहिंसा, संयम आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात असतानाच बल्लारपूरमध्ये मात्र ड्राय डेच्या दिवशी बारमध्ये मद्यपान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गांधी जयंतीच्या दिवशी शासनाने घोषित केलेल्या ड्राय डेच्या नियमांना हरताळ फासत पत्ता गोदाम जवळील बारमध्ये ग्राहकांना मद्य उपलब्ध करून दिल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी बारमालक, वेटर/मॅनेजरसह मद्यपानासाठी जमलेल्या १८ जणांवर कारवाई केली. या प्रकरणी एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे पथकसह रात्री १० वाजताच्या सुमारास पेट्रोलिंगवर असताना त्यांना बारमध्ये ड्राय डे असतानाही मद्यपान सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पथकासह बारकडे धाव घेतली.
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता बारच्या बाहेर काही वाहने उभी असल्याचे दिसून आले. खिडकीतून पाहणी केली असता बारचा वेटर/मॅनेजर ग्राहकांना मद्य उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बारमध्ये प्रवेश करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच दरवाजे बंद करण्याचा तसेच मद्यपान करणाऱ्या ग्राहकांना दुसऱ्या खोलीत हलविण्याचा प्रयत्न झाल्याचेही कारवाईदरम्यान समोर आले.
बारच्या आतील खोलीत पाहणी केली असता तब्बल १८ जण मद्यपानासाठी बसलेले आढळले. परिसरात वापरलेले ग्लास, रिकाम्या मद्याच्या व बिअरच्या बाटल्या तसेच मद्यपानासोबत सेवन करण्यासाठी ठेवलेले चकणा खाद्यपदार्थ अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. त्यामुळे गांधी जयंतीच्या दिवशीही बारमध्ये मद्यपान सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट झाले.
या प्रकरणात बारमालक विशांक उर्फ पुक्की शंकरसिंग सोमबंशी ५० वर्षे आणि वेटर/मॅनेजर अजय विलास दडमल २३ वर्षे यांच्यासह मद्यपानासाठी उपस्थित असलेल्या १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई), ६८, ८३ आणि ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत ९६० रुपयांची रोख रक्कम, दोन डिजिटल पेमेंट मशिन, विविध कंपन्यांच्या व्हिस्कीच्या भरलेल्या बाटल्या, मद्यपानासाठी वापरलेले ग्लास तसेच रिकाम्या मद्य व बिअरच्या बाटल्या असा एकूण ५ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मद्याचे आवश्यक नमुने सीलबंद करून रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
या कारवाईची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्यानंतर विभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत बारची पाहणी करण्यात आली आणि पोलिस, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पंच यांच्या समक्ष पंचनामा व जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
गांधी जयंती हा संयम, व्यसनमुक्ती आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा दिवस असताना त्याच दिवशी ड्राय डेचे उल्लंघन करून बारमध्ये मद्यपान सुरू असल्याचे समोर आल्याने या कारवाईची शहरात चर्चा रंगली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहेत.




Petrol Price




