जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषद सभापतींचे चौकशीचे आदेश


वृत्तसंस्था / मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.   २४ जून रोजी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती.
विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यात ‘जलयुक्त शिवार’च्या कामातील भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी केली असून या आरोपात तथ्य असल्याचेही सावंत यांनी लेखी उत्तरात मान्य केले होते. केवळ पुरंदर तालुक्यातच नव्हे तर आणखी १३०० प्रकरणांत अनियमितता झाल्याच्या तक्रारी असून त्याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे मंत्र्यांनीच सांगितल्यामुळे सत्ताधारी पक्षाची कोंडी झाली. अखेर सभापती रामराजे निंबाळकर यांनी हा प्रश्न राखून ठेवला होता. 
बुधवारी विधानपरिषदेत पुन्हा हा मुद्दा उपस्थित होताच तानाजी सावंत यांनी यावर उत्तर देण्यास सुरुवात केली होती. पण विरोधकांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केल्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी हस्तक्षेप करत लाचलुचपत विभागामार्फेत चौकशी करण्याचा आदेश दिला.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-01


Related Photos