फेसबुकवर आलेला अश्लील, आक्षेपार्ह मजकूर तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अतिताणामुळे मृत्यू


वृत्तसंस्था / सन फ्रान्सिको : फेसबुकवरील मजकूर तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अतिताणामुळे मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत गेल्या वर्षी घडल्याचे वेगेजच्या एका अहवालात म्हटले आहे. फेसबुकचे ९८ टक्के अचूकतेचे निकष पाळताना त्याचा अतिताणाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फेसबुकच्या या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिताण आहे. या कर्मचाऱ्यांना फेसबुकवर आलेला अश्लील, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे काम असते. तसेच फेसबुकवर आत्महत्येबाबतची माहिती, फोटो आणि मुलांपर्यंत आश्लील मजकूर पोहचू नये, यासाठी प्राधान्याने काम करावे लागते. त्यांना दररोज सतर्क राहून अशा प्रकारचे मजकूर हटवावे लागतात.
फ्लोरिडातील किथ उटले या ४२ वर्षांच्या कर्मचाऱ्याचा या कामाच्या अतिताणाने मृत्यू झाला आहे. फेसबुकने निश्चित केलेले ९८ टक्के अचूकतेचे लक्ष्य गाठण्यात तो अयशस्वी ठरला होता, असे वेगेजच्या अहवालात म्हटले आहे. उटले हा कोस्ट गार्डमध्ये लेफ्टनंट कमांडर होता. लष्करातून निवृत्त झाल्यावर तो फेसबुकमध्ये आक्षेपार्ह मजकूर हटवण्याच्या कामावर रुजू झाला होता. उटलेवर कामाचा अतिताण होता आणि वरिष्ठांकडून होणारी विचारणा, त्यांच्याकडून होणार अपमान यामुळे तो नेहमी नैराश्यात असायचा असे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या मागे त्याची पत्नी जॉनी आणि दोन लहान मुली आहेत. 
या घटनेनंतर फेसबुकने सहकारी कंपन्यांचे ऑडीट करून कंत्राटदारांकडून काम करून घेण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. तसेच या कामासाठी गरज भासल्यास आणखी काही पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

   Print


News - World | Posted : 2019-06-22


Related Photos