आयुष्याची दिशा ठरवून वाटचाल करा : योगिताताई पिपरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
पुढे आपल्याला काय व्हायच आहे, हे पाल्यांनीच ठरवायचे आहे. यासाठी पालकांनी पाल्यावर जोरजबरदस्ती करू नये, असे आवाहन करीत विद्यार्थ्यांनी आयुष्याची दिशा ठरवून पुढील वाटचाल करावी, असा सल्ला नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. 
नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम शुक्रवारी (२१ जून) नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती वर्षा बट्टे, वैष्णवी नैताम, नगरसेवक प्रमोद पिपरे, संजय मेश्राम, अल्का पोहनकर, लता लाटकर, मुख्याधिकारी संजीव ओहोळ, शिक्षण विभागाचे बंडू ताकसांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमारंभी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. पुढे नगराध्यक्ष योगिता पिपरे म्हणाल्या, शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. शिक्षणातून आपल्याला प्रगतीचा मार्गे निवडता येतो. चांगले शिक्षण हे संस्कार, विचाराचे माध्यम असून आत्मविश्वासाने पुढे जावून यशस्वी व्हा, असा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. तर नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी भारतात लोकशाही असल्याने राजकारणातही हुशार राजकारणी असले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री व आता देशाचे पंतप्रधान असून त्यांनी गेल्या पाच वर्षात देशात नवनवीन लोकहिताच्या योजना राबवून शेवटच्या नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात तुम्हीही राजकारणी, डॉक्टर, अधिकारी होणार आहात, असे सांगून यासाठी तुमचे शिक्षण सत्कर्मी ठरणार, असल्याचे ते म्हणाले. संचालन व आभार गणेश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-22


Related Photos