पुलवामामध्ये पुन्हा आयईडी स्फोट : दोन जवान शहीद, सात जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जम्मू-कश्मीर :
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात काल  झालेल्या आयईडी स्फोटात गंभीर जखमी झालेले दोन जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात एकूण ९ जवान जखमी झाले होते . त्यातील दोन जवानांची प्रकृती चिंताजनक होती. आज मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आहे . 
आज  सकाळी अनंतनागमध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यात जैश ए मोहमदचा कमांडर सज्जाद भटसह अन्य एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दुसरीकडे या चकमकीत एक जवान शहीद झाला असून अन्य एक जवान जखमी झाला आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याची योजना सज्जादनेच आखल्याचे समोर आले आहे. तसेच त्या हल्ल्यात वापरण्यात आलेली कारही सज्जादचीच होती.
दरम्यान, सोमवारी दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या हिंदुस्थानच्या ४४राष्ट्रीय रायफल्स गाडीवर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी अरिहाल भागात पेट्रॉलिंगला करणाऱ्या लष्कराच्या गाडीशेजारी आईडी स्फोटकांनी भरलेली कार ठेवून त्याचा स्फोट घडवून आणला. यात ९ जवान जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती नाजूक होती. लष्कराची ही गाडी बुलेटप्रूफ होती. पण तरीही ९ जवान जखमी झाले. यातील दोन जवान आज सकाळी उपचारादरम्यान शहीद झाले. विशेष म्हणजे यावेळी दहशतवाद्यांनी इशारा देऊन पुलवामात हा दुसरा हल्ला घडवला. १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी ज्याठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यापासून अवघ्या २७ किलोमीटर अंतरावर हा दुसरा हल्ला करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीही दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये लष्कराच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यात ५ जवान शहीद झाले होते. यात जम्मू-कश्मीर पोलीस उपनिरिक्षक अशद खान हे देखील गंभीर जखमी झाले होते. सोमवारी ते शहीद झाले.  Print


News - World | Posted : 2019-06-18


Related Photos