महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यात २ लाख ८ हजार जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसिकरण


-  जिल्ह्याला २ लाख ७६ हजार लस मात्रा प्राप्त

-  ७५ टक्के लसिकरण, ५० टक्के गोठे फवारणी

-  लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी सहकार्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : राज्यासह जिल्ह्यात जनावरांवरील लम्पी चर्मरोगाची तिसरी लहर लक्षात घेता या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने काटेकोरपणे नियोजन केले आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ लाख ८ हजार जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसिकरण करण्यात आले आहे. जवळजवळ ५० टक्के गोठ्यांमध्ये फवारणीचे काम पुर्ण झाले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. 

लम्पी चर्मरोगाची तिसरी लहर नियंत्रणासाठी काटेकोरपणे नियोजन केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लसीकरण, गोचिड, गोमाशा निर्मुलन व शासनाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार रोगावर उपचार कार्यक्रमाचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये १०५ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत असून उपलब्ध तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तसेच अन्य सेवादात्यांची मदत घेऊन लसीकरण कार्यक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे.

जिल्ह्याला लसिकरणासाठी शासनाकडून २ लाख ७६ हजार लसमात्रा प्राप्त झालेल्या आहे. आजपर्यंत २ लाख ८ हजार म्हणजे जवळजवळ ७५.३ टक्के लसीकरण पुर्ण झालेले आहे. येत्या सात दिवसात १०० टक्के लसीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने गोचिड गोमाशा निर्मुलनासाठी गोठ्याची फवारणी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत ५० टक्के गावांतील गोठ्यांची फवारणी झालेली असून उर्वरीत गावांतील गोठ्यांची फवारणीचे कार्य युध्दपातळीवर सुरु आहे. गोठे फवारणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशुपालक, लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतींचे सहकार्य घेतले जात आहे. 

लम्पी चर्मरोगाची लक्षणे दिसून येताच तातडीने पशुवैद्यकांकडून प्रोटोकॉलनुसार उपचार करुन घ्यावा. जेणेकरुन रोगाची तिव्रता न वाढता उपचाराने जनावरे लवकरात लवकर बरे होईल व इतर ठिकाणी रोग पसरणार नाही. रोगग्रस्त जनावरांची खाण्या पिण्याची वेगळी व्यवस्था करावी तसेच दूर अंतरावर बांधण्यात यावे व इतरत्र ठिकाणी, बाजारात किंवा जिल्ह्याबाहेर जनावरांची हालचाल करू नये.

पशुसंवर्धन विभागाकडे औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण ३७ जनावरे रोगग्रस्त असून एप्रिल पासुन १६ जनावरांचा मृत्यु झालेला आहे. रोगग्रस्त जनावरांवर दैनंदिन उपचार सुरु आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना पशुरोग नियंत्रणासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos