महत्वाच्या बातम्या

 कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा शिरकाव : शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कापूस पीक सद्यस्थितीत पात्या, फुले तसेच बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करतांना पिकामध्ये टेहाळणीसाठी एकरी २ फेरोमोन सापळे याप्रमाणे लावणे अत्यंत गरजेचे आहे, वेष्ठनावरील सुचणे नुसार विशिष्ट कलावधीत वडया (लुर) बदलाव्या व दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे. कपाशीला पात्या आल्यानंतर व त्यापुढे ७ ते ८ वेळा पिकामध्ये दर १० दिवसानंतर ट्रायकोग्रामा बॅकट्री या परोपजीवी मित्रकीटक असलेले पिवळे ट्रायकोकार्ड एकरी ३ कार्ड कपाशीच्या शेतामध्ये सोडवित.

फुलोरा अवस्थेत दर आठवड्याने गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या शोधून नष्ट कराव्यात. फुले व बोंड धरण्याच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझँडीरेक्टिन ३०० पी.पी.एम. ५० मी.ली. किंवा वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना बिव्हेरिया बॅसीयाणा १.१५ टक्के डब्ल्यु. पी. ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक कीटकनाशके वापरतांना क्वीनोलफाँस २० टक्के ए.एफ. २५ मिली किवा सायपरमेथ्रिन १० टक्के प्रवाही ७.६ मिली किंवा फेन्प्रोपॅथ्रीन १०/३० टक्के प्रवाही ७.५/ २.५ ते ३.४ मिली किंवा क्लोरांट्रानीलिप्रोल ९.३ टक्के अधिक लॅमडा सायहलोथ्रिन ४.६ टक्के झेड.सी. ५ मिली किंवा डेल्टामेथ्रिन १ टक्के अधिक ट्रायझोफोस ३५ टक्के प्रवाही १० ते १२.५ मिली किंवा क्लोरपायरीफोस अधिक सायपरमेथ्रिन ५ टक्के १० मिलि वरीलपैकी कुठलेही एक कीटकनाशक १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सदर कीटकनाशकाची दिलेली मात्रा ही साध्या पंपासाठी आहे पेट्रोल पंपासाठी मात्रा तिप्पट करावी. पायरेथ्राइड वर्गातील  कीटकनाशके खबरदारी म्हणून त्यांचा कपाशीचे पीक ७० ते ७५ दिवसाचे झाल्यानंतरच एक किंवा दोन वेळा वापर करावा. पायरेथ्राइडच्या अधिक वापरामुळे पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

सर्वेक्षण : पात्या व फुले अवस्थेत किमान दर आठवड्याने शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून त्यावरील प्रादुभावग्रस्त फुले (डोमकळ्या), पात्या, बोंडे मोजून ५ ते १० टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण आढळल्यास तसेच प्राधान्याने बोंडावस्थेत २० हिरवी बोंडे तोडून (प्रत्येक झाडावरील एक याप्रमाणे) त्यात ५ ते १० टक्के प्रादुभावग्रस्त बोंडे किंवा २० पैकी २ बोंडात गुलाबी किंवा पांढर्‍या अळ्या असल्यास आर्थिक नुकसान संकेत पातळी समजून रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.





  Print






News - Wardha




Related Photos