आचारसंहितेमुळे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित


- २९ सप्टेंबर रोजी होणारा रोजगार मेळावा पुढील आदेशापर्यंत लांबणीवर; नोंदणी केलेल्या उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक - २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी या रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे नियोजित कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन तारीख स्वतंत्रपणे कळविणार -
रोजगार महाकुंभाची नवीन तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालये, नोंदणी केलेले उमेदवार तसेच इतर संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी नवीन तारखेबाबत अधिकृत सूचनेची प्रतीक्षा करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयांनी सर्व तयारी स्थगित ठेवावी -
या अनुषंगाने रोजगार महाकुंभाच्या आयोजनाशी संबंधित सर्व महाविद्यालयांनी पुढील आदेशापर्यंत कार्यक्रमाची प्रसिद्धी, उमेदवारांची नोंदणी, उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबतची कार्यवाही तसेच इतर सर्व तयारी तात्पुरती स्थगित ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यामुळे रोजगार महाकुंभासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी २९ सप्टेंबर रोजी नियोजित ठिकाणी उपस्थित राहू नये, तसेच कार्यक्रमाच्या नव्या तारखेबाबत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनेची प्रतीक्षा करावी.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केलेल्या सर्व नोकरीइच्छुक उमेदवारांनी कार्यक्रम स्थगित झाल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




