नागरिकत्वाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  नागरिकत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठविली आहे. १५ दिवसांत या नोटिसीला उत्तर देण्यास सांगितले आहे.
भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींच्या मुद्द्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाला दोनदा पत्र पाठवले आहे. त्यात राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.  स्वामी यांनी २१ सप्टेंबर २०१७ रोजी यासंदर्भात पहिली तक्रार केली होती. त्यानंतर २९ एप्रिल २०१९ ला दुसरे पत्र गृह मंत्रालयाला पाठवले होते. त्यात राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांनीही निवडणूक आयोगाकडे राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल तक्रार केली होती.
राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक आहेत, असा दावा डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. २००३ मध्ये ब्रिटनमध्ये बॅकॉप्स लिमिटेड या कंपनीचे रजिस्ट्रेशन ब्रिटनमध्ये झाले. राहुल गांधी या कंपनीचे संचालक आणि सचिव होते. कंपनीने २००५ आणि २०१६ मध्ये सादर केलेल्या परताव्यात राहुल गांधी यांची जन्म तारीख १९ - ०६ - १९७०  असून ते ब्रिटनचे नागरिक असल्याचा यात उल्लेख आहे. असे स्वामी यांनी पत्रात म्हटले आहे. १७ फेब्रुवारी २००९ मध्ये कंपनी बंद करण्याच्या वेळीदेखील राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रांमध्ये होता, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.   Print


News - World | Posted : 2019-05-01


Related Photos