उद्योगविरहीत जिल्ह्यात कामगारांना कामच मिळेना, सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद असल्याने शेकडो मजूरांच्या हाताला काम नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
उद्या १ मे रोजी कामगार दिन आहे. मात्र कामगारांच्या हाताला काम मिळेल तेव्हाच कामगार सुखी राहील आणि कामगार दिन साजरा करताना कामगारांचाही उत्साह दिसून येईल. मात्र उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यात कामगारांना कामच मिळत नसल्याने हजारो कामगार कामाच्या शोधात भटकंती करीत आहेत. तसेच जिल्ह्यात सुरजागड येथील पहाडीवर सुरू असलेल्या उत्खननाच्या कामावर शेकडो मजूर कार्यरत होते. मात्र मागील साडेतीन महिन्यांपासून काम बंद असल्याने या कामगारांवर देखील संकट कोसळले आहे. यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळेल तरच कामगार समृध्द होईल, तेव्हाच कामगार दिनाला महत्व देता येईल, असे बोलल्या जात आहे. 
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे उद्योग धंदे नाहीत. यामुळे सुरजागड येथील लोहखनीजांवर आधारीत लोहप्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे उभारण्याची पायाभरणी लाॅयड मेटल या कंपनीच्या वतीने करण्यात आली. अजूनपर्यंत प्रकल्प उभा राहिलेला नाही. मात्र सुरजागड येथून खनीजांचे उत्खनन सुरू होते. जानेवारी महिन्यात खनीजे वाहून नेणाऱ्या  ट्रक आणि रापमंच्या बसचा भिषण अपघात झाला. यानंतर काही राजकीय पक्ष, संघटना तसेच स्थानिक नागरीकांनी आंदोलन करून पहाडीवरील उत्खननाचे काम बंद पाडले. तेव्हापासून या कामावरील शेकडो मजूर, वाहन चालक आदींचा रोजगार हिरावल्या गेला. काम सुरू करावे या मागणीसाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी प्रशासन आणि कंपनीच्या वतीने काम सुरू केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापही काम सुरू झाले नाही. तसेच यावर्षी तेंदूपत्ता हंगामसुध्दा आचारसंहीतेत अडकला. यामुळे मजूरांवर घरीच बसण्याची पाळी आली आहे. यामुळे मजूरांवर उदरनिर्वाह कसा करावा, असा विचार करण्याची वेळ आली आहे.  प्रशासनाने आणि कंपनीने कामगारांच्या हितासाठी काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच प्रस्तावित लोहप्रकल्पाचे कामही लवकरात लवकर सुरू करून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-30


Related Photos