तीन वाहनांच्या समोरा - समोर अपघातात एक जण जागीच ठार


- सावंगी गावाजवळील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव : 
टाटा मॅजिक, झायलो व दुचाकी या तीन वाहनाच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना राळेगाव वडकी या सिमेंट महामार्गावरील सावंगी गावाजवळ आज २६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता दरम्यान घडली.
 नामदेवराव वांगे (५०) रा. आपटी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार इसमाचे नाव असून ते आपल्या हिरो स्प्लेंडर दुचाकी क्र. एम.एच.२९ ए.वाय.५९६२ ने तालुक्यातील आपटी येथून लग्न कार्यासाठी राळेगाव येथे जात होते.  दरम्यान लग्न कार्यात पोहोचण्यापूर्वीच राळेगाव पासून एक किलोमीटर आधिच सावंगी गावाजवळ राळेगाव कडून प्रवासी घेऊन येणाऱ्या भरधाव टाटा मॅजिक एम.एच.२९ आर. ६९७२ ने जबर धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार नामदेवराव वांगे हे जागीच ठार झाले.अपघात घडताच सदर टाटा मॅजिक हे वाहन अनियंत्रित होऊन महामार्गावर वडकी कडून राळेगाव कडे जाणाऱ्या झायलो एम.एच.३३ ए. ३३०६ या वाहनास सुद्धा धडक दिली असून या अपघातात झायलो वाहनाचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती राळेगाव पोलिसांना कळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व सर्व प्रथम मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविला होता.या तीन वाहनाचा विचित्र अपघात बघण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची प्रंचड गर्दी जमली होती त्यामुळे काही काळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात अन्य कुणालाही दुखापत झाली नसली तरीही पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील वडकी येथे झालेल्या कार आणि ऑटोच्या अपघातात पाच जण जागीच ठार तर सोळा जण गंभीररित्या जखमी झाले होते त्यामुळे संपूर्ण तालुक्यासह प्रशासन पार हादरून गेले होते. केवळ पोलिस प्रशासनाच्या वाहतूक शाखेचे सर्व आलबेल असल्याने वाहतूकदारांमध्ये पोलीस प्रशासनाप्रती धाकच राहीला नाही परिणामी वाहतूकीचे नियम पायदळी तुडवल्या जात असून निष्पाप नागरिकांना आपले बहुमूल्य प्राण गमवावे लागत असल्याचे वास्तव या दिवसागणिक घडणाऱ्या अपघाताच्या घटनातून समोर येत आहे. तालुक्यात अपघाताचे सत्र सुरू असताना आता राळेगाव पोलिसांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी विशेष उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2019-04-26


Related Photos