साखरा जवळ झाड कोसळल्याने गडचिरोली - नागपूर मार्गावरील वाहतूक खोळंबली


- जिल्ह्यास वादळाचा तडाखा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
जिल्ह्यात सर्वत्र वादळाचा तडाखा बसत असून विविध मार्गांवर झाडे कोसळून मार्ग अडत आहेत. आज २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आलेल्या प्रचंड वादळामुळे साखरा पासून १ किमी अंतरावर भल्ले मोठे झाड कोसळल्याने गडचिरोली - नागपूर मार्गावरील वाहतूक खोळंबली. वृत्त लिहिपर्यंत झाड हटविण्यात आले नव्हते. यामुळे बऱ्याच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाउस आणि वादळाचा तडाखा सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज दुपारपासून वातावरणात बदल होत आहे. यामुळे नागरीकांची प्रचंड धावपळ होत आहे. सायंकाळी आलेल्या वादळामुळे रस्त्यावरून वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरीकांना त्रास सहन करावा लागला. काही भागात पाउससुध्दा कोसळला. असंख्य झाडे कोसळली. अहेरी उपविभागासही वादळाने झोडपून काढले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने वर - वधू पित्यांची दमछाक होत आहे. सायंकाळी भोजनाचे कार्यक्रम उरकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मंडप, डेकोरेशन तसेच अन्य साहित्याचे नुकसान होत आहे. आजही अनेक गावांमधील लग्नकार्यांमध्ये वादळामुळे अडथळे आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-21


Related Photos