अमित शहा यांची गडचिरोलीतील सभा रद्द, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


- विमानात बिघाड झाल्याची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रचार सभा अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आली. विमानात बिघाड झाल्यामुळे अमित शहा हे नागपूरला पोहचू शकले नाहीत अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. यामुळे भर उन्हात आलेले कार्यकर्ते नाराज असून काहींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 
अमित शहा यांच्या सभेची भाजपाच्या वतीने तयारी करण्यात आली होती. लोकसभा क्षेत्रातून कार्यकर्ते सुध्दा पोहचले होते. मात्र ऐनवेळी सभा रद्द करण्यात आल्याने कार्यकर्ते आल्यापावली परतले. विदर्भात तसेच गडचिरोली जिल्हा मुख्यालयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची ही पहिलीच सभा होती.  गडचिरोली च्या सभेनंतर चंद्रपूर येथे शहा यांची सभा होती. मात्र हि सभासुद्धा रद्द झाल्याची माहिती आहे.  काॅंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या सुध्दा सभा रद्द करण्यात आल्या होत्या. 
अमित शहा यांची विदर्भातील पहिलीच सभा असल्यामुळे विदर्भातील अनेक भागातून पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले होते. उन्हात तसेच प्रचंड उकाड्यात हे कार्यकर्ते सभा सुरु होण्याची वाट पाहत होते. मात्र ऐनवेळी सभा रद्द झाल्याचे कळताच कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.  उन्हातान्हात आलेल्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळाला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-07


Related Photos