सर्पदंश प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेत विशेष कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या वतीने साप व सर्पदंश प्रतिबंध आणि जनजागृती या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन २१ सप्टेंबर रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. जिल्ह्यात सर्पदंशाच्या वाढत्या घटना आणि त्यातून होणारे मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा, वन्यजीव क्षेत्रातील संस्था तसेच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्षदीप पारिकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडली. सर्पदंश प्रतिबंध व जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वाइल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीला यावेळी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने डॉ. किरण बावस्कर, गौरांग वाईकर, नितीश भांदक्कर, दिनेश खाटे, अजय यादव आणि अक्षय यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत विषारी व बिनविषारी सापांची ओळख, विषारी सर्पदंशानंतर दिसणारी प्रमुख लक्षणे, शरीरावर होणारे परिणाम, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची प्राथमिक काळजी तसेच रुग्णाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता रुग्णाला शक्य तितक्या लवकर जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करावे. पारंपरिक व चुकीच्या उपचारपद्धतींवर अवलंबून न राहता वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्तरावरील कर्मचारी आणि नागरिकांना सर्पदंशाबाबत योग्य माहिती व प्रशिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. वेळेत योग्य उपचार मिळाल्यास सर्पदंशामुळे होणारे गंभीर परिणाम आणि जीवितहानी टाळता येऊ शकते.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता सापांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करून मानव-सर्प सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच सर्पदंशाच्या घटनांमध्ये जीवितहानी कमी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सातत्याने जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन करण्यावर भर देण्यात आला.




Petrol Price




