महत्वाच्या बातम्या

 रेल्वेगाडीत मोबाईल चोरट्यास अटक : लोहमार्ग च्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वेगाडीत चार्जिंगवर लावलेले मोबाईल चोरी करून कमी रकमेत विकणाऱ्या चोरट्यास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. साहिल गौर वय २२ वर्ष रा. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून दहा महागडे मोबाइल जप्त करण्यात आले.

गोंदिया येथील साहिलला नशा करण्याची सवय असून, व्यसन पूर्ण करण्यासाठी तो प्रवाशांचे मोबाईल चोरतो. प्रवासी मोबाइल चार्जिंगला लावून आराम करतात. त्याचा फायदा तो सहज घेत मोबाईल चोरी करायचा. चोरी केलेले मोबाइल कमी किमतीत विकून मिळालेल्या पैशाने तो व्यसन पूर्ण करायचा. तसेच एका मैत्रिणीवरही तो पैसे उडवायचा. रेल्वेत मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते आणि याबद्दल अनेक तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी मोबाइल चोऱ्यांवर नियंत्रणासाठी रेल्वेगाडीत पेट्रोलिंग वाढविली. सद्यःस्थितीत साहिलने छत्तीसगडच्या दुर्गमध्ये भाड्या खोली घेतली होती आणि तो दुर्ग ते गोंदिया आणि गोंदिया ते नागपूरदरम्यान मोबाइल चोरी करायचा. चोरी केलेले मोबाईल एका पिशवीत भरून साहिल विक्रीसाठी गोंदियात आला होता. संशयाच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी विचारपूस केली असता त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत दहा मोबाइल आढळले. चौकशी केली असता मोबाइलच्या विक्रीसाठी गोंदियात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या ताब्यातून २ लाख ५९ हजार ९४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, महेंद्र मानकर, चंद्रशेखर मदनकर, राजेश पाली, विनोद खोब्रागडे, अविन गजबे, राहुल यावले, गिरीश राऊत, पंकज बांते आणि मंगेश तितरमारे यांनी केली.          





  Print






News - Chandrapur




Related Photos