नांगपूरच्या जंगलात मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड : दीड कोटींचा मुद्देमाल जप्त, ३४ जुगारी अटकेत

- ताडपत्रीच्या शेडमध्ये गुप्तपणे सुरू होता जुगार; छत्तीसगडमधील बड्या जुगाऱ्यांचाही सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कोटगूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांगपूर गावाजवळील घनदाट जंगलात ताडपत्रीचे शेड उभारून अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगूल पोलिसांनी सोमवारी पहाटे धडक कारवाई केली. या छाप्यात ४ लाख ४४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, तसेच विविध वाहने आणि इतर साहित्य असा १ कोटी ४६ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोख रकमेसह एकूण १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या कारवाईत घटनास्थळावरून ३४ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच सुमारे १५ ते २० जण अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पहाटे सव्वातीनच्या सुमारास छापा -
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांना नांगपूरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून एलसीबीच्या पथकाने कोटगूलचे पोलिस अधिकारी विवेक वायकर आणि स्थानिक पोलिसांना सोबत घेत कारवाईची आखणी केली.
त्यानुसार सोमवारी पहाटे सुमारे ३.१५ वाजता पोलिस पथक नांगपूरच्या घनदाट जंगलात दाखल झाले. जंगलात काही अंतर आत गेल्यानंतर पोलिसांना मोठ्या संख्येने चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी असल्याचे दिसून आले. त्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.
पुढे जाऊन पाहणी केली असता ताडपत्रीच्या शेडमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या एलईडी बल्बच्या प्रकाशात सुमारे ५० जण पैशांची बाजी लावत पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ चारही बाजूंनी परिसराला घेराव घालत छापा टाकला. अचानक झालेल्या कारवाईमुळे जुगाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यापैकी ३४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर १५ ते २० जण अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पसार झाले.
छत्तीसगडमधील बड्या जुगाऱ्यांचा समावेश -
अटक करण्यात आलेल्या ३४ जणांमध्ये शेजारील छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, बालोद, दुर्ग, डोंगरगाव, डोंगरगड आणि दल्ली राजहरा परिसरातील जुगाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील कोटगूल तसेच गोंदिया जिल्ह्यातील वडेगाव येथील व्यक्तींचाही या जुगार अड्ड्यावर सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्य सूत्रधार अद्याप फरार -
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या जुगार अड्ड्याचे मुख्य सूत्रधार म्हणून परमेश्वर लोहंबरे रा. नांगपूर आणि मिथुन तांबेकर रा. कोटगूल यांची नावे समोर आली आहेत. हे दोघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नांगपूरच्या जंगलात मागील अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगाऱ्यांची ये-जा सुरू असतानाही हा अड्डा अत्यंत गुप्तपणे चालविला जात होता. छाप्यानंतर या अवैध जुगार अड्ड्याचे जाळे आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगूल पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश झाला असून, पसार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.




Petrol Price




