नवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या बंधनकारक , १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
नवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट- एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आल्या आहेत.  येत्या  १ एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे वाहनचोरीच्या प्रकारांना ब्रेक बसू शकणार आहे. तर  नंबर प्लेटवरील नावानुसार क्रमांक ठेवणारे शब्दही हद्दपार होणार आहेत. 
 सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल १३ वर्षांनी राज्य परिवहन विभागाने 'एचएसआरपी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेट वाहन कंपन्याच बनवून देतील आणि विक्रेते क्रमांक कोरून देतील. मोठ्या विरोधानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. १ एप्रिलपासून  प्रत्येक नवीन वाहनावर याच नंबर प्लेट लावण्यात येणार आहेत. या नंबर प्लेट बदलणे, क्रमांकात बदल करणे किंवा त्यावर दुसरा क्रमांक नोंदणे असे प्रकार शक्य होणार नाहीत. याचा थेट फायदा पोलिसांनासुद्धा होणार आहे. विशेषत: वाहनचोरीच्या प्रकारात नंबर प्लेट बदलणे, एवढेच काम चोरट्यांकडून केले जाते. नवीन नंबर प्लेटबाबत ही शक्यता धूसर असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो, असे मत एका वाहन विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने व्यक्त केले. दरम्यान, वाहनांच्या नंबर प्लेटवर विशिष्ट प्रकारे आकडे लिहून 'दादा', 'भाऊ' असे शब्द तयार केले जातात. या प्रकारांनासुद्धा यामुळे आळा बसणार आहे. सध्या नवीन वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, भविष्यात जुन्या वाहनांसाठीसुद्धा हा नियम लागू होऊ शकतो, अशी माहिती  आहे. 

असे असेल 'एचएसआरपी' 

-हॉट स्टॅम्पिंग व स्नॅप लॉक 

-'इंडिया' लिहिलेले बारकोड आणि थ्रीडी होलोग्राम 

-आरटीओ, वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास मिळणार वाहनाची पूर्ण माहिती   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-20


Related Photos