कोरेगावात महिलांची धडाकेबाज कारवाई : दारूसाठा, मोहसडवा व साहित्य जप्त


-कागदपत्रे रोखून विक्रेत्यांची करणार कोंडी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, ४० रिकामे ड्राम आणि इतरही साहित्य जप्त केले. सोबतच दारूविक्रेत्यांना कुठलीही आवश्यक दाखले ग्रामपंचायत मधून मिळणार नसल्याचा व रोहयोची कामेही त्यांना न देण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत घेऊन विक्रेत्यांची कोंडी केली जाणार आहे. महिलांच्या या कृतीमुळे व ग्रा.पं. च्या निर्णयामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
 आरमोरी तालुक्यापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव येथे दारूचा महापूर असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. अनेकदा प्रयत्न करूनही विक्रेते जुमानत नव्हते. त्यामुळे हे गाव इतरही गावासाठी डोकेदुखी ठरले आहे. मुक्तिपथ तालुका टीम ने येथे बैठक घेऊन आधी महिलांना संघटीत केले. महिलाही स्वबळावर दारूविक्री बंद करू शकत असल्याचा विश्वास दिला. त्यामुळे गत आठवड्यात येथे गाव संघटन तयार करून महिलांनीच दारूच्या प्रश्नावर विशेष ग्रामसभा बोलाविली. या ग्रामसभेत गावात दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला. सोबतच २८ दारूविक्रेत्यांची यादी तयार करून त्यांना विक्री बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली. तरीही गावात दारूविक्री सुरूच होती. त्यामुळे १२ रोजी मंगळवारी मुक्तिपथ तालुका चमुद्वारे गाव संघटनेला अहिंसक कृतीबाबत सांगताच महिलांनी सर्व गावाला संघटीत करून दारूविक्रेत्यांच्या घरी धाड मारून आणि विक्रेत्यांचे जंगलातील अड्डे शोधून काढत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, ४० रिकामे ड्राम जप्त केले. गावातील काही पुरुषही या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांनी स्वतः जप्त केलेली दारू रस्त्यावर ओतून नष्ट केली. मिळालेले साहित्य डोक्यावर उचलून महिलांनी ते चौकात आणले. यातील दारूच्या डबक्यांची होळी करण्यात आली आणि ड्राम ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात आले. महिलांच्या या कारवाईने दारूविक्रेतेही थक्क झाले होते. कोरेगावच्या सरपंच जिजा उसेंडी, माजी सरपंच बालाजी गेडाम, पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी, गावसंघनेच्या अध्यक्ष सुनीता मडावी, सचिव सुलोचना राऊत यांच्यासह ४० ते ४५ महिला आणि पुरुष या अहिंसक कृतीत सहभागी झाले होते.
 

दाखले, रेशन मिळणार नाही

दारूविक्रीबंद होण्यासाठी ग्रामपंचायत ने कठोर पाउल उचलले आहे. दारूविक्री करीत असलेल्यांना यापुढे रेशनकार्ड वर धान्य न देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. त्यासोबतच आवश्यक दाखले आणि कागदपत्रांपासून त्यांना मुकावे लागणार आहे.

रोहयोच्या कामातुनही वगळले

ग्रामसभेत दारूविक्रेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. नोटीस देऊनही दारूविक्री सुरूच ठेवल्याने विक्रेत्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावरूनही कमी करण्यात आले आहे. त्यांची यादी रोजगार सेवकांना देऊन मस्टरवरून त्यांची नावे वगळण्यात आली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-13


Related Photos