महत्वाच्या बातम्या

 एसटी चालती पंढरीची वाट, गुरुवारपासून फेऱ्या सुरू : सात दिवस, ४९ बसेसचे नियोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आषाढी एकादशी आता पुढ्यात आहे. मात्र, विठुराच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
जमेल त्याची गाठ बांधून अनेकांनी पंढरीची वाट धरली आहे. तर, यंदा प्रथमच विठुरायाने त्यांना एक दमडीही खर्च न करता पंढरीला बोलवून घेतल्याने गावोगावचे वारकरी एसटीच्या लालपरीकडे धाव घेत आहेत. लेकुरवाळ्या एसटीनेही त्यांना सोबत घेऊन पंढरीची वाट धरली आहे.
गुरुवार, २२ जूनपासून वारकऱ्यांच्या सेवेत एसटी रुजू झाली आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने नागपूर ते थेट पंढरपूर अशी सरळ सेवा सुरू केली आहे.


आषाढ म्हटला की विठुरायाच्या भक्तांना पंढरीची ओढ लागते. लाखोंच्या संख्येतील पावलं विठुरायच्या पंढरपूरकडे वळतात. लाखो जण पायी वारी करतात. वृद्धत्व आणि अशाच कोणत्या कारणामुळे ज्यांना पायी चालणे जमत नाही, अशी मंडळी शक्य असेल त्या वाहनाने विठुरायाच्या पंढरीकडे निघतात. इच्छा असूनही पैसे गाठीशी नसल्याने काही जण घरूनच लाडक्या विठुरायाला हात जोडतात. आपल्या भक्तांची हिरिरिने काळजी घेणाऱ्या विठुरायाने लाखो भाविकांना मोफत पंढरपुरात पोहचता येईल, अशी सोय एसटीच्या माध्यमातून यावर्षी केली आहे.


यंदा प्रथमच लाखो भाविकांना एसटीचे तिकिटच लागणार नाही तर काहींना केवळ ५० टक्के प्रवासभाडे देऊन पंढरी गाठता येणार आहे. चंद्रभागेत पवित्र स्नान करून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी भाविक अन् एसटीही सज्ज झाली आहे. नागपूर विभागातून एसटी महामंडळाने २२ ते २९ अशा सात दिवसांत ४९ बसेस नागपूर ते पंढरपूर सोडण्याची व्यवस्था केली आहे. गुरुवारी त्याचा प्रारंभ झाला आहे.


सर्वाधिक बसेस २६ जूनला : 
यंदा २९ जूनला आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी भाविकांना पंढरीत पोहचता यावे म्हणून एसटीने २४ जूनला ८, २५ जूनला ७ तर २६ जूनला सर्वाधिक १० बसेस नागपूरातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos