गडचिरोली जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष द्यावे : मुनगंटीवार


- गडचिरोली नियोजन आराखडा १०० कोटींची अतिरिक्त मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / गडचिरोली  :
गडचिरोली जिल्ह्यात चार बाबींवर लक्ष केंद्रीत करुन विकासकामे व्हावीत यात शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष द्यावे असे निर्देश राज्याचे वन, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
  येथील विभागीय कार्यालय सभागृहात आयोजित गडचिरोली जिल्हा नियोजन समितिच्या सर्ष 2019-2020 च्या वाढीव मागण्यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याच्या 100 कोटीची वाढीव मागणी यावेळी करण्यात आली.
  या बैठकीला वित्त व नियोजन तथा गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, जि. पं. अध्यक्ष योगिता भांडेकर विभागीय  आयुक्त संजीव कुमार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा नियोजन निधीची मर्यादा 145 कोटी असून आकांक्षित जिल्हा कार्यक्रमासाठी नियतव्ययाच्या 25 टक्के अधिक निधी यात सामील करुन एकूण आराखडा 181 कोटींचा आहे आणि वाढीव मागणी 100 कोटी रुपयांची आहे असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सादरीकरणात सांगितले.
 गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी शासन सकारात्मक आहे असे सांगून वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले की शाळा तसेच आरोग्य यंत्रणा याची निकड लक्षात घेऊन गडचिरोलीला मागाल तितका निधी देवू तसेच या जिल्ह्यात रोजगार निर्मिती वर भर देणाऱ्या कार्यक्रमांनाही मागाल तेवढा निधी शासन देईल.  शाळांसोबत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या देखील बांधा असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.

 परिपूर्ण स्टेडियम होणार-

 गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा संकूलाच्या जागेचा ताबा मिळाला असून या संकूलासाठी 52 कोटी रुपयांची विशेष मागणी जिल्हाधिकारी शेखर  सिंह यांनी केली. बांधकाम विभागाने हे काम करावे असे निर्देश  वित्तमंत्र्यांनी दिले.  हे क्रीडा संकुल अद्ययावत स्वरुपाचे असणार आहे. याबाबतचे व्हिडिओ सादरीकरण या बैठकीत करण्यात आले.
 या संकुलात मुख्य ईमारतीसोबत 390 चौरस मीटर क्षेत्रफळात 5 बैडमिंटन कोर्ट , एक इनडोअर व्हॉलीबॉल कोर्ट, एक इनडोअर सभागृह, 400 मीटर ट्रॅक व खेळासाठी मैदान यासह खाद्यपदार्थ दुकानांचाही समावेश असणार आहे.

नाट्यगृह-

 गडचिरोली शहरासाठी एक सूसज्ज नाट्यगृह आवश्यक आहे. याचे काम पूर्ण करण्यासाठी 1.5 कोटींची रक्कम आवश्यक आहे अशीही मागणी जिल्हाधिकारी सिंह यांनी केली.  या बैठकीस गडचिरोलीचे नियोजन अधिकारी टी.एस. तिडके, नियोजन विभागाचे कृष्णा फिरके, सागर पाटील, शितल नवले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-19


Related Photos