महत्वाच्या बातम्या

 अवैध धंद्यांवर चंद्रपूर पोलिसांचा कडक प्रहार : ऑगस्टमध्ये ४५९ आरोपी जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने ऑगस्ट २०२६ मध्ये व्यापक धडक मोहीम राबविली. दारूबंदी, जुगार, गोवंश तस्करी, अमली पदार्थ, अवैध रेती उत्खनन, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासह विविध गैरकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली. या मोहिमेत एकूण ३७८ गुन्हे दाखल करून ४५९ आरोपींना अटक करण्यात आली असून ८० लाख ६८ हजार ६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी कायद्यांतर्गत ३५५ गुन्हे उघडकीस आणून ५० लाख ३१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दारूविरोधातही पाच कारवाया करून २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जुगाराविरोधातील कारवाईत ८८ प्रकरणे दाखल करण्यात आली असून तब्बल १ कोटी ५ लाख ११ हजार ६११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध जनावरांच्या वाहतुकीविरोधात १८ कारवाया करत १७९ जनावरांची सुटका करण्यात आली. यावेळी ३१ वाहनांसह १ कोटी ९६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमली पदार्थांविरोधातही पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. NDPS कायद्यांतर्गत ५७ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये २० किलो ९९ ग्रॅम गांजा, ४ ग्रॅम ६५० मिलीग्रॅम एमडी असा एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

रेती चोरीविरोधात आठ प्रकरणांमध्ये कारवाई करून तब्बल १ कोटी ५७ लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिबंधित सुगंधी तंबाखूविरोधात ११ गुन्हे दाखल करून १९ लाख ८६ हजार ५१३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर कोटपा कायद्यांतर्गत ६९७ प्रकरणांमध्ये १ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. हत्यार कायद्यान्वये नऊ कारवाया करून ७ लाख ९८ हजार १०० रुपयांची शस्त्रे जप्त करण्यात आली. यात दोन भरमार बंदुका, पाच पिस्तूल, २६ जिवंत काडतुसे, एक तलवार, एक चाकू आणि एक सत्तूर यांचा समावेश आहे.

सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रतिबंधक कारवाईलाही वेग देण्यात आला. ऑगस्टमध्ये मकोका कायद्यांतर्गत तीन कारवाया करण्यात आल्या, तर सहा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी मोठी मोहीम राबविली. जिल्ह्यात २२ हजार १०२ प्रकरणे दाखल करून १ कोटी ९० लाख ८९ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ५ हजार ५३३, सीटबेल्ट न लावणाऱ्यांविरुद्ध १ हजार १०८, ट्रिपल सीट २ हजार ६, वाहन चालविताना मोबाईल वापरण्याच्या ५८६, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या २८८, चुकीच्या बाजूने वाहन चालविण्याच्या ४७ आणि अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याच्या १४ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायदा कलम १२२ अंतर्गतही २ हजार ४६ प्रकरणे दाखल करण्यात आली.

पोलिसांच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील प्राणघातक अपघातांमध्ये ११ ने घट झाली असून अपघाती मृत्यूचे प्रमाण २२ ने, म्हणजेच ९.१२ टक्क्यांनी कमी झाले आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही पोलिसांना यश मिळाले. जबरी चोरी अर्थात चेन स्नॅचिंगचे चार गुन्हे उघडकीस आणून १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. घरफोडीचे १२ गुन्हे उघडकीस आणून ४ लाख ८४ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचे ३७ गुन्हे उघडकीस आणून ७४ लाख २९ हजार ४६० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यात ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या ताब्यात घेण्यात आल्या.

हरवलेल्या व अपहृत व्यक्तींच्या शोधासाठीही पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. ऑगस्ट महिन्यात एकूण ९५ हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. यात १६ मुली, पाच मुले, ४८ महिला आणि २६ पुरुषांचा समावेश आहे.

तपास अधिकारी आणि पैरवी अधिकाऱ्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे न्यायालयीन प्रकरणांतही पोलिसांना यश मिळाले.

ब्रम्हपुरी पोलीस ठाणे, नागभीड पोलीस ठाणे आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना ऑगस्ट महिन्यात न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी अवैध धंद्यांविरोधातील ही धडक मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





  Print






Related Photos