गडचिरोलीच्या मोहा लाडूने मेळघाट मधील महिला झाल्या मोहित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली आणि कृषीसमृध्दी समन्वयित कृषी विकास प्रकल्प अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अतिदुर्गम भागातील टेम्ब्रुसोडा या गावात पाच स्वयंसहाय्यता बचत गटातील कोरकू आदिवासी महिलांसाठी एक दिवसीय मोहा फुलापासून लाडू तयार करण्याचे प्रशिक्षण माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते. या मोहा लाडूने मेळघाटातील महिला चांगल्याच मोहित झाल्या.
प्रशिक्षण देण्यासाठी दीपज्योती लोक संचालित साधन केंद्र धानोराच्या उपजीविका समन्वयक सहयोगीनी लता उईके, समन्वयक निर्मला वाढणकर, मोहा लाडू उत्पादक गट धानोराच्या महिला उपस्थित होता. मोहा लाडू प्रशिक्षणाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे विभागीय आयुक्त पियुष सिंह, वित्त विभाग कृषी समृध्दी समन्वयीक कृषी विकास प्रकल्पाचे सहाय्यक संचालक दिगंबर नेमाने, प्रकल्प व्यवस्थापक भालचंद्र गावंडे उपस्थित होते.
याप्रसंगी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी मोहा लाडूबाबत विस्तृतपणे पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशनद्वारे माहितीचे सादरीकरण केले. यावेळी पाच प्रोड्यूसर कंपनीच्या २५ कोरकू आदिवासी महिलांना कुपोषित बालकांकरीता पौष्टीक मोहा लाडू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाकरीता माविम अमरावती जिल्हा कार्यालयाचे अधिकारी तथा टेम्ब्रुसडा लोक संचालित साधन केंद्र चिखलदराचे पदाधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-18


Related Photos