शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे बुधवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर


- चला शाळेत जाऊया अभियानच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा; शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक व्यवस्थेची पाहणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे बुधवार, ९ सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या चला शाळेत जाऊया अभियान च्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. यासोबतच मंत्री भुसे हे विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील शैक्षणिक व्यवस्थेची पाहणी करणार आहेत.
मंत्री दादा भुसे हे बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडाऱ्याकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शाळा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भेटीदरम्यान शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापनाची स्थिती तसेच शैक्षणिक व्यवस्थेच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठक -शाळा भेटीनंतर दुपारी १ वाजता जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे चला शाळेत जाऊया अभियानच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यात अभियानाची सद्यस्थिती काय आहे, अभियानाची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने सुरू आहे, तसेच शाळांमधील विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करणे आणि शाळा व्यवस्थापनाशी संबंधित बाबींना अधिक प्रभावीपणे गती देणे, या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
मंत्री भुसे यांच्या प्रत्यक्ष शाळा भेटी आणि त्यानंतर होणाऱ्या आढावा बैठकीमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थेतील प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनासमोर येण्यास मदत होणार आहे. तसेच शाळांमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा आणि प्रलंबित शैक्षणिक बाबींवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सायंकाळी गोंदियाकडे प्रयाण -
भंडारा जिल्ह्यातील दौरा पूर्ण केल्यानंतर मंत्री दादा भुसे हे सायंकाळी ७ वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने गोंदियाकडे प्रयाण करणार आहेत. मंत्री भुसे यांच्या या दौऱ्यामुळे चला शाळेत जाऊया अभियानच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीला अधिक गती मिळण्याबरोबरच शाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेच्या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेण्याची संधी मिळणार आहे.




Petrol Price




