उसरपार चक जवळील नहरात पडलेल्या निलगायीचे वनविभागाने वाचविले प्राण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
सुजित भसारकर/ पाथरी :
सावली तालुक्यातील उसरपार चक गावाजवळील गोसेखूर्द नहरात काल २५ नोव्हेंबर रोजी निलगाय पडल्याची माहिती वनविभागास मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून निलगायीला बाहेर काढले. यामुळे निलगायीला जिवदान मिळाले आहे.
गोसेखूर्दचा नहर जंगलामधून काढण्यात आला आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. रस्ता ओलांडताना निलगाय नहरात पडली असावी. नहराच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट काॅंक्रीटीकरण करण्यात आले असल्याने तिला बाहेर निघणे शक्य झाले नाही. आज सोमवारी वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठले. वनपाल राहुल तांबरे, वनरक्षक राकेश चौधरी , विशाखा शेंडे, जी.टी. नवघरे, एम.व्ही. नागोसे, वाय.पी. लाड, वनमजूर भारत उंदिरवाडे यांनी निलगायीला बाहेर काढण्यासाठी परीश्रम घेतले. तिच्यावर पालेबारसा येथील पशुवैद्यकीय अधिकारी जांभुळकर यांनी उपचार केले. यानंतर सोडून देण्यात आले. गोसेखूर्दचा हा कालवा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असला तरी वन्यप्राण्यांना जिवघेणा ठरत आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-26


Related Photos