क्रेन्सने केले गिधाड संशोधनावरील अहवालाचे विमोचन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
निसर्ग रक्षण, संशोधन आणि निसर्ग जनजागृती तथा शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत कन्झर्वेशन रिसर्च अँड नेचर एज्युकेशन सोसायटी (क्रेन्स) या संस्थेने जागतिक संकटग्रस्त प्रजातीच्या सूचित असलेल्या अति दुर्मिळ गिधाड पक्ष्यांवर तब्बल सात महिने शास्त्रीय संशोधन करून या संशोधनाचा अहवाल वन्यजीव साप्ताह समारोप कार्यक्रमात वनविभागाला सुपूर्द केला.
या कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक   डब्ल्यू. आय. यटबॉन, उपवनसंरक्षक  शिवाजी फुले, सहायक वनसंरक्षक  सोनल भडके, गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी  कैलुके, मानद वन्यजीव रक्षक  मिलिंद उमरे, क्रेन्सचे मुख्य संशोधक डॉ. अमित सेटिया, क्रेन्सच्या सचिव अंजली कुळमेथे, कोषाध्यक्ष   नेहा सेटिया आदींची प्रमुख उपस्थिती होती. निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखले जाणारे गिधाड पक्षी झपाट्याने कमी होत असून त्यांच्या शास्त्रीय संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेत वनविभागाने ही महत्वपूर्ण जबाबदारी अनुभवी निसर्गअभ्यासकांचा समावेश असलेल्या क्रेन्स संस्थेला दिली. या संस्थेने अथक परिश्रमाने गिधाडांवर शास्त्रीय पद्धतीने संशोधन केले. संपूर्ण गडचिरोली वन विभागात सदर अभ्यास करण्यात आलेला होता. या प्रकल्पात मुख्य संशोधक म्हणून डॉ. अमित सेटिया व सह संशोधक म्हणून  मिलिंद उमरे यांनी कार्य केले. तसेच संस्थेच्या या संशोधन प्रकल्पासाठी सहायक वनसंरक्षक  सोनल भडके, कुनघाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी  महेशकुमार शिंदे, वनपाल विशाल सालकर, क्रेन्सच्या सचिव अंजली कुळमेथे,  नेहा सेटिया, ज्येष्ठ निसर्गअभ्यासक संजय शेगावकर, वनरक्षक महेश तलमले, क्रेन्सचे निकेश भरने, शरद डोके, महेंद्र नान्हे, रोशनी मंडल, भाग्यश्री साहारे, ट्विंकल गेडाम, तसेच गिधाडमित्र सुभाष मेड्पल्लीवर, किरण वासेकर, राहुल कापकर आदींनी सहकार्य केले. मुख्य वनसंरक्षक  डब्ल्यू. आय. यटबॉन, उपवनसंरक्षक   शिवाजी फुले यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संशोधन अहवालाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी क्रेन्सचे संशोधक तथा जैव विविधता अभ्यासक डॉ. अमित सेटिया यांनी संशोधनाची संधी दिल्याबद्दल वनविभागाचे व संयुक्त वन व्यवस्थापन समिती दर्शनी (चक) यांचे आभार मानले.

अनेक रहस्यांचा शोध...

सतत सात महिने चाललेल्या या गिधाड संशोधन प्रकल्पात गिधाडांच्या अनेक रहस्यांचा शोध घेण्यात संस्थेच्या संशोधकांना यश मिळाले. या संशोधनासाठी बॉम्बे नँचरल हिस्ट्री सोसायटीचे संजय करकरे यांनीही मोलाची मदत केली. संस्थेकडून गडचिरोली वन विभागात गिधाडांच्या चार प्रजातिंचा वावर असल्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या प्रकल्पातून प्राप्त माहितीवर अधिक संशोधन करून नामांकित जर्नल्समध्ये शोधनिबंध लिहिण्यात येणार आहेत. या प्रकल्पात उकल झालेल्या गिधाडांच्या रहस्यांचा उपयोग त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी होणार आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-28


Related Photos