अंगणवाडीतील पोषण आहाराच्या फेरतपासणीत काही नमुने निकषांनुसार अनुरूप नसल्याचे स्पष्ट


- १८ डिसेंबरला नमुने नागपूर प्रयोगशाळेत; अहवालानंतर महिला व बालविकास विभागाकडून दक्षतेच्या सूचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या फेरतपासणीदरम्यान काही नमुने निर्धारित निकषांनुसार अनुरूप नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने गोंडपिपरी आणि पोंभुर्णा येथील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून आहाराच्या वितरणाबाबतची माहिती मागवून घेतली असून, बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या निर्धारित पाककृतीनुसार ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त संस्थेमार्फत केला जातो. अंगणवाडी केंद्रात आहार प्राप्त झाल्यानंतर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली होती. या प्राथमिक तपासणीत कोणतीही तफावत आढळली नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. जानेवारी महिन्यात पोषण आहाराचा पहिला तपासणी अहवाल चांगला आला होता, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) भागवत तांबे यांनी दिली.
फेरतपासणीसाठी १८ डिसेंबरला नमुने पाठविले -
वितरित करण्यात आलेल्या पूरक पोषण आहारातील नमुने फेरतपासणीसाठी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर येथे गोंडपिपरी व पोंभुर्णा येथील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत १८ डिसेंबर २०२५ रोजी पाठविण्यात आले होते.
प्रयोगशाळेच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या तपासणी अहवालानुसार काही नमुने निर्धारित निकषांनुसार अनुरूप नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. नमुना स्वीकारल्याचा दिनांक आणि प्रत्यक्ष तपासणीचा दिनांक यामध्ये सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लोटल्याचे विभागाने स्पष्ट केले.
पोषण आहारासाठी वापरण्यात येणारा गहू व तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडून उपलब्ध करून दिला जातो, अशी माहितीही विभागाने दिली आहे.
जिवंत किड्यांबाबत तक्रार नसल्याचे विभागाचे स्पष्टीकरण -
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच महिला व बालविकास कार्यालयाने गोंडपिपरी आणि पोंभुर्णा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांकडून आहाराच्या वितरणासंदर्भातील माहिती व अहवाल मागवून घेतला.
प्राप्त अहवालांची तपासणी केली असता, डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ मध्ये पूरक पोषण आहारामध्ये जिवंत किडे असल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. प्रयोगशाळेचे अहवाल ३० मार्च आणि २२ एप्रिल २०२६ रोजी प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आहाराची गुणवत्ता तपासूनच वितरणाचे निर्देश -
बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका/पर्यवेक्षक तसेच अंगणवाडी सेविकांना आवश्यक त्या नियमित सूचना देण्यात आल्या आहेत.
आहाराचा साठा प्राप्त करताना गुणवत्ता, पॅकिंग, मुदत, रंग, वास, चव आणि इतर दृश्यमान बाबींची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुणवत्तेबाबत शंका असलेला किंवा संशयास्पद आहार बालकांना वितरित करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
तक्रार असल्यास तात्काळ संबंधित कार्यालयास कळवावे -
बालकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे भागवत तांबे यांनी स्पष्ट केले. आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार किंवा शंका आढळल्यास ती तात्काळ संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास कळवावी, असे आवाहन त्यांनी केले.
फेरतपासणी अहवालातील निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्रांमध्ये वितरित होणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या गुणवत्ता तपासणी, साठवणूक आणि वितरण प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. बालकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही बाब दुर्लक्षित होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
News - Chandrapur




Petrol Price




