जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन


- ९ ऑगस्ट रोजी सप्तश्रृंगी ध्वजारोहण, माल्यार्पण व भव्य मिरवणूक; कै. बाबुराव मडावी चौकात मुख्य कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व सहयोगी आदिवासी संघटनांच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ ते ९ या वेळेत शहरातील विविध ठिकाणी सप्तश्रृंगी ध्वजारोहणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता माल्यार्पणाचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि एकतेचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
कै. बाबुराव मडावी चौकात मुख्य कार्यक्रम -
मिरवणुकीनंतर बाबुराव मडावी चौक येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होईल. यानंतर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून, समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची सामाजिक एकजूट, सांस्कृतिक वारसा आणि हक्कांविषयीची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधवांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व सहयोगी आदिवासी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




