नक्षल सप्ताह दरम्यान माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ ने केले जप्त


- स्फोटक साहित्यासह एकुण १४ अग्निशस्त्रे जप्त
- नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोमके बंगाडी हद्दीत पोलीस दलाची यशस्वी कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपूष्टात आली आहे. सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हेे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात दिनांक २३ मे, २७ मे व २७ जून २०२६ रोजी केलेल्या कारवाईसोबतच दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस व सिआरपीएफच्या जवानांना यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की,मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे माओवाद्यांनी महाराष्ट्र - छत्तीसगड सिमेवरील मौजा कुमनार जंगल परिसरात मोठया प्रमाणावर अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाल्याने दिनांक ३१ जूलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक प्राणहिता येथील ०४ तुकड्या, बिडीडीएसचे ०१ पथक व सिआरपीएफचे पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते.
दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून घेरा घालुन बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता सदर ठिकाणावरुन १) ०१ नग एस.एल.आर. रायफल, २) ०१ नग .३०३ रायफल,३) ०७ नग १२ बोअर रायफल, ४)०३ नग सिंगल शॉट रायफल, ५) ०२ नग बिजीएल लॉन्चर्स, ६) ०३ नग एस. एल. आर. मॅगझिन, ७) ०१ नग आय. ई. डी. स्फोटक, ८) ०२ नग बॅटरी असे इ. माओवादी साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले सर्व माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनिल उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक व इंट सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




