महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


- महर्षी वेदव्यासांना अभिवादन; गुरु-शिष्य परंपरेचा जागर, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि संस्कारपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता, शिस्त, संस्कार आणि ज्ञानाची ओढ निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिगुरू महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥ या गुरुस्तवनाचे पठण करून गुरुंना वंदन केले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारा शिल्पकार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे त्याच्या गुरुंचे मार्गदर्शन, संस्कार आणि प्रेरणा असते. गुरुंच्या शिकवणुकीचा आदर करून त्यांचे विचार जीवनात आचरणात आणणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. सैनिक विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी शिस्त, राष्ट्रभक्ती आणि चारित्र्य या मूल्यांवर घडला पाहिजे.

पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महर्षी वेदव्यास यांनी भारतीय ज्ञानपरंपरेला अमूल्य योगदान दिले. वेदांचे संकलन, महाभारताची निर्मिती आणि अनेक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविला. गुरुपौर्णिमा हा गुरुंच्या ऋणाची जाणीव करून देणारा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि परिश्रम या मूल्यांचा अंगीकार करून आदर्श नागरिक बनावे.

गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांसाठी महर्षी वेदव्यासांचे जीवनकार्य व भारतीय गुरु-शिष्य परंपरा या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिनिअर गटात प्रथम क्रमांक अर्सालन बेग याने पटकावला, तर वीर सावरकर हाऊसचा कॅडेट मास्टर कृतांत गोमासे याने द्वितीय क्रमांक मिळविला. ज्युनिअर गटात चंद्रशेखर आझाद हाऊसचा विभास खेवले याने प्रथम, तर वीर सावरकर हाऊसचा यथार्थ गिरडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुष्प अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. गुरुंच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानार्जन करून राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प केला.

यावेळी प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, प्रा. संदीप कोटांगले, घनश्याम वाळके आणि रहीम पटेल यांनी गुरु-शिष्य परंपरेचा इतिहास, भारतीय संस्कृतीतील गुरुंचे स्थान आणि जीवनात योग्य मार्गदर्शकाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर संगीत शिक्षक सुनील लोखंडे यांनी गीतामधून महत्व पटवून दिले 

भाषण स्पर्धेचे परीक्षण घनश्याम वाळके व गजानन अनमुलवार यांनी केले.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बोबाटे यांनी केले, तर शहादुल्ला खान यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos