राज्य अन्न आयोगाने घेतला नागपूर जिल्ह्याचा विशेष आढावा


- पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या अन्न धान्याची गुणवत्ता, त्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य अन्न आयोगाने नागपूर जिल्ह्याचा विशेष आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे आणि सदस्य ईश्वर बाळबुध्ये यांनी नागपूर जिल्ह्यास सदिच्छा भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे आयोजित बैठकीत अन्न व नागरी पुरवठा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यानंतर आयोगाच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे आणि अन्नधान्य वितरण अधिकारी शालिनी गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान अध्यक्षांनी स्पष्ट केले की, अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे ही शासनाची प्राथमिकता असून प्रत्येक पात्र नागरिकाला वेळेवर व दर्जेदार धान्य मिळणे हा त्याचा हक्क आहे. प्रशासनाने या प्रक्रियेत अधिक सुलभता आणावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच पुरवठा विभागाशी संबंधित काही तक्रारी किंवा सूचना असल्यास, नागरिक त्या लेखी स्वरूपात जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे सादर करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
News - Nagpur




Petrol Price




