बालसुरक्षेचा जागर : भालेराव पब्लिक स्कूलमध्ये १०९८ हेल्पलाइन जनजागृती कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बालकांच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा चाइल्डलाइन आणि रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन १०९८ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी भालेराव पब्लिक स्कूल, बल्लारपूर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ५०० विद्यार्थी आणि २४ शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे, असे सांगितले. त्यांनी बालकांचे कौशल्य विकास, बाल संरक्षण, काळजी व सुरक्षिततेसाठी शासन विविध योजना राबवत असून त्यांचा लाभ प्रत्येक गरजू बालकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा भास्करवार होत्या. यावेळी आयोजक वैभव गायकवाड, व्यवस्थापक उमेश उंदीरवाडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनचे सुपरवायझर भास्कर ठाकूर, विजय अमर्थराज आदी मान्यवर उपस्थित होते.
समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे यांनी विद्यार्थ्यांना गुड टच–बॅड टच, बालकांची सुरक्षा, बालविवाहमुक्त भारत, विधिसंघर्षग्रस्त बालकांची संकल्पना, बालहक्क, महिला सक्षमीकरण तसेच वन स्टॉप सेंटरच्या सुविधा याविषयी सविस्तर माहिती दिली.
तर भास्कर ठाकूर यांनी १०९८ चाइल्ड हेल्पलाइन ही मुलांसाठी २४ तास, वर्षभर कार्यरत असलेली मोफत आपत्कालीन सेवा असल्याचे सांगत तात्काळ मदत, समुपदेशन, पोलीस व प्रशासनाशी समन्वयाची प्रक्रिया स्पष्ट केली. तसेच अल्पवयीन मुलांचे घरातून निघून जाण्याची कारणे, सोशल मीडियाचा अतिवापर, ऑनलाइन मैत्रीतील फसवणूक, कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि बालतस्करीसारख्या गंभीर विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुस्तके व माहिती पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शाळेच्या वतीने मिनाक्षी भस्मे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद धर्माधिकारी यांनी केले, तर अहमद शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भालेराव पब्लिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
News - Chandrapur




Petrol Price




