महत्वाच्या बातम्या

 कळमन्यात मुसळधार पावसामुळे घरे, ग्रामपंचायत कार्यालय व शाळेत पाणी : मोठे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालिका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक भागांत पाणी साचले. नाल्यांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने घाण पाणी थेट ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच अनेक नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. या घटनेत धान्य, कपडे, घरगुती साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून काही घरांच्या भिंतीही कोसळल्या.

प्राप्त माहितीनुसार, रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास घरांमध्ये अचानक पाणी शिरण्यास सुरुवात झाली. काही वेळातच अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना रात्रभर जागून संसारोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे लागले. मात्र, अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

नाल्यांची साफसफाई व पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायत कडे केली होती. वेळेत नाल्यांची साफसफाई झाली असती तर पाणी घरांमध्ये शिरले नसते, असे त्यांचे म्हणणे आहे.

या पावसामुळे ग्रामपंचायत कार्यालयातही पाणी शिरून महत्त्वाची कागदपत्रे भिजली. तसेच ग्रामपंचायतलगतच्या जिल्हा परिषद शाळेत सुमारे दोन फूट पाणी साचल्याने शाळेत ठेवलेली सुमारे १५ पोती सिमेंट खराब झाली.

घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांची साफसफाई करण्यात आली. दरम्यान, पाण्यासोबत घाण आणि कीटक घरांमध्ये शिरल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती बल्लारपूरचे गट विस्तार अधिकारी धनंजय साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.

संबंधित अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींची निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या घटनेत अजय कोटनाके, नागेश कोटनाके, प्रमोद दयावार, लतीफ शेख, चंपत गाडगे, इस्राईल शेख, तुळसीराम झुंगरे यांच्यासह अनेक कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरून धान्य, कपडे व घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, गट विस्तार अधिकारी साळवे यांनी जेसीबी पाठवून नाल्या साफ करण्याकरीता पाठविले. तसेच आरोग्य सेवा २४ तास उपलब्ध करून दिले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos