महत्वाच्या बातम्या

 अघोरी पूजेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक : दोन महिला अटकेत, एक उपचाराधीन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पतीच्या गंभीर आजारपणाने मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलेची दैवी शक्ती, अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विद्या विठ्ठलराव निमजे आणि शबनम या दोन महिलांना अटक केली आहे. तर संशयित शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख हिला छातीत दुखू लागल्याने सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिला अद्याप अटक करण्यात आले नाही.

जोडदेऊळ, पठाणपुरा वॉर्ड येथे राहणाऱ्या वैशाली अनिल खनके यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा उघडकीस आला. इराई नदीवरील पुलासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना ७१ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाले होते. त्याच काळात त्यांचे पती गंभीर आजारी असल्याने संपूर्ण कुटुंब आर्थिक व मानसिक संकटातून जात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत शेजारी भाड्याने राहण्यासाठी आलेल्या विद्या निमजे हिने वैशाली खणके यांच्याशी विश्वासाचे संबंध निर्माण केले.

माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी तुमच्या पतीला पूर्णपणे बरे करू शकते, असा विश्वास देत विद्याने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर विविध धार्मिक विधी, अघोरी पूजा आणि विशेष अनुष्ठानांच्या नावाखाली ५ लाख २५ हजार रुपये धनादेशाद्वारे उकळले. एवढ्यावरच न थांबता ती नियमितपणे ताईत, चिठ्ठ्या, धुनीची पावडर आणि विविध पूजेचे साहित्य देत, त्याचा उपयोग केल्यास आजार दूर होईल, असा भ्रम निर्माण करत राहिली. घराचे कल्याण होईल, असे सांगून तिने वैशाली यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही स्वतःकडे घेतले.

यानंतर फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढली. २४ जुलै रोजी विद्याने वैशाली खणके यांना बँकेत नेऊन १० लाख रुपये रोख काढण्यास भाग पाडले आणि ती रक्कम स्वतःकडे घेतली. दुसऱ्याच दिवशी, २५ जुलै रोजी, घर खरेदीसाठी ठेवलेले आणखी १० लाख रुपये तिने घेतले. या पैशांपैकी काही रक्कम शाहिस्ता अंजुम आणि शबनम यांच्याकडे दिल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, लाखो रुपये खर्च करूनही पतीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. पैसे दुप्पट करण्याचे आमिषही खोटे ठरल्याने वैशाली खणके यांना फसवणुकीचा संशय आला. त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच फसवणुकीच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ताईत, अघोरी पूजेचे साहित्य आणि अंधश्रद्धा पसरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तू जप्त केल्या आहेत.

या प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आल्या असून, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos