महत्वाच्या बातम्या

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची वर्धा जिल्ह्यात पहिली यादी जाहीर : ३३ हजार २७ शेतकरी पात्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत ३३ हजार २७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता आधार प्रमाणिकरण ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील ७४ हजार ३६५ शेतकरी कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३३ हजार २७ शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी आतापर्यंत ३ हजार ७९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून २९ हजार२३५ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८४ गावांतील पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावासमोर विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे, त्यांनी आधार कार्ड घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना प्रमाणिकरणासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यादीतील रक्कम किंवा आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी संबंधित केंद्रावर तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक सहकार सहकार अधिकारी श्रेणी-१, तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच संबंधित बँकांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्याची खात्री करून नावासमोरील विशिष्ट क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह जवळच्या सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रशासनाने सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे, त्यांच्या कर्जखात्यात कर्जमुक्ती योजनेचा लाभ शासनामार्फत लवकरच जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत आपले नाव तपासून त्वरित आधार प्रमाणिकरण करून शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था गौतम वालदे यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos