महिला बचत गट हे आत्मनिर्भर गडचिरोलीचे भक्कम आधारस्तंभ : योगिता पिपरे


- महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे यावे – आ. डॉ. मिलिंदजी नरोटे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत सातव्या दिवशी गडचिरोली येथील कर्तव्य कक्ष कार्यालयात यशस्वी महिला बचत गट सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि उद्योजकीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध महिला बचत गटांतील महिलांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागात बचत, स्वयंरोजगार आणि उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबनाची वाट निर्माण करणाऱ्या महिलांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी महिला बचत गटांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, महिला बचत गट हे केवळ बचतीचे माध्यम नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आणि महिलांना आत्मनिर्भर बनविणारे भक्कम आधारस्तंभ आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ३,५०० बचत गटांनी शासनाच्या विविध योजना, मुद्रा कर्ज, लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे यावे. महिलांकडे नाविन्यपूर्ण उद्योगाची कल्पना असल्यास ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, सहकार्य आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील. प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि उद्योजिका बनावी, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी महिला सक्षमीकरणाला ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, महिला सक्षमीकरणाशिवाय ग्रामीण विकासाला गती मिळू शकत नाही. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक महिला बचत गटापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. बचत गटांनी उत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून गडचिरोलीच्या आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा विकास साध्य होईल.
यावेळी सेवा महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. सेवा, संघटन आणि समाजहित या त्रिसूत्रीच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच सात दिवस यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या सेवा महोत्सवासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, माजी भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा डोळस, भाजप जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा सीमा कन्नमवार, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, अर्चना बोरकुटे तसेच अन्य मान्यवर आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या सन्मान सोहळ्यातून देण्यात आला. उपस्थित महिलांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आत्मनिर्भर गडचिरोलीच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




