महत्वाच्या बातम्या

 राज्य शासनाच्या कर्जमाफीसह वीजबिल माफीमुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना तसेच शेतकऱ्यांची जुनी वीजबिल थकबाकी पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

वर्धा येथील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, महामंत्री अशोक कलोडे, कमलाकर निंभोरकर आणि गिरीश कांबळे उपस्थित होते.

कर्जमाफी योजनेत मोठा दिलासा -

डॉ. भोयर यांनी सांगितले की, पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या योजनेत अशा शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यापुढील रक्कम संबंधित शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. तसेच पूर्वीच्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

दिवसा शंभर टक्के वीजपुरवठ्याचे उद्दिष्ट -

साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडून आधीच वीजबिल आकारले जात नसल्याचे सांगून डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, त्यांची जुनी थकबाकीही पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. सौरपंप आणि सौर कृषिवाहिनी योजनेमुळे सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत असून, चालू वर्षाअखेरपर्यंत हा आकडा १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

दुष्काळमुक्तीसाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचे -

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पासह विविध जलसंधारण योजनांना गती दिली आहे. या माध्यमातून गोदावरी आणि तापी खोऱ्यात पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठी २४ नवीन धरणांची उभारणी आणि १६ विद्यमान धरणांची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठीही मोठ्या प्रमाणात योजना राबविण्यात येत असून, त्यामुळे सिंचनक्षमता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.





  Print






News - Wardha




Related Photos