महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यातील ५ सराईत गुन्हेगार तडीपार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कठोर पाऊल उचलत पाच सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६ अन्वये स्वतंत्र आदेश काढून ही कारवाई करण्यात आली असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किसन उर्फ अमन महेंद्र डोंगरे २७ वर्षे महावीर नगर, भिवापूर वॉर्ड, विशाल पापा तांबे ३० वर्षे बाबूपेठ बाबानगर, गणेश राजू बैस २५ वर्षे बिनबा गेटजवळ, बिनबा वॉर्ड, अनिल हिरामन ठाकूर ४४ वर्षे नांदगाव पोडे आणि नरसिंग गट्टू रेवेल्लीवार ५५ वर्षे प्रकाशनगर, महाकाली कॉलरी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींविरुद्ध चोरी, घरफोडी, जबर दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे, जुगार, अवैधरित्या मद्याची विक्री व साठा करणे यांसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत. त्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, स्थानिक नागरिक आणि साक्षीदार आरोपींच्या भीतीमुळे पोलीस अथवा न्यायालयासमोर उघडपणे साक्ष देण्यासही धजावत नव्हते.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर पोलीस ठाणे व रामनगर पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी संबंधित पुरावे व कागदपत्रांची कायदेशीर पडताळणी केल्यानंतर पाचही आरोपींना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश जारी केले.

जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके तसेच रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Chandrapur




Related Photos