महत्वाच्या बातम्या

 भरधाव ट्रकने चार जनावरांना चिरडले : चालक ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भरधाव ट्रकच्या धडकेत चार जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. अपघातानंतर ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला सतर्क नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एपी ३९ यूयू ६६७९ क्रमांकाचा ट्रक बल्लारपूरहून चंद्रपूरच्या दिशेने येत होता. चंद्रपूर शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उताराच्या रस्त्यावर ट्रकने रस्त्यावर असलेल्या चार जनावरांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चारही जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्याचा पाठलाग करून सुमारे ५०० मीटर अंतरावर ट्रक अडविला. चालकाला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचा पंचनामा करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृत जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहर पोलिसांनी सांगितले की, नागरिकांनी पकडून दिलेल्या चालकाला पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. ट्रकचा मालक आंध्र प्रदेश येथील असून, त्याच्या उपस्थितीनंतर जनावरांच्या नुकसानभरपाईबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

उतारामुळे वाढतो अपघातांचा धोका -

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील रस्ता उताराचा असल्याने बल्लारपूरकडून येणाऱ्या वाहनांचा वेग अनेकदा नियंत्रणाबाहेर जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

 विशेषत : महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर महाविद्यालयासमोर तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत तसेच वाहनचालकांना सावध करण्यासाठी पिवळ्या रंगाचा इशारा दिवा कौशन लाईट बसविण्यात यावा, अशी मागणी बजरंग दलाचे राजेश यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाकडे केली आहे.






  Print






News - Chandrapur




Related Photos