गोंदिया कृषी विभागाची दमदार कामगिरी : विविध योजनांतून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : वर्ष २०२५-२०२६ मध्ये गोंदिया जिल्हा कृषी विभागाने विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यात महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान योजना, कृषी यांत्रिकीकरण, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच डिजिटल शेतीला चालना देणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळाला आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासोबतच आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शेतीला गती मिळत असल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे ९८.९४ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. तसेच पीकविमा योजनेअंतर्गत ३८.५० कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला असून, नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ३१ हजार ६४४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात थेट २१५.९८ कोटी रुपये जमा करण्यात आले. या आर्थिक सहाय्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च भागविणे आणि उत्पादन वाढीसाठी गुंतवणूक करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.
आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २ हजार ५५२ लाभार्थ्यांना ३०.३४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. त्यामुळे आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा वापर वाढून शेती अधिक कार्यक्षम आणि उत्पादनक्षम बनण्यास मदत झाली आहे.
अन्न प्रक्रिया क्षेत्रातही गोंदिया जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत १९६ लाभार्थ्यांना २.३८ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले, तर मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत ३२ लाभार्थ्यांना २६.२७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. या योजनांमुळे कृषीपूरक उद्योगांना चालना मिळून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
रब्बी हंगामातील क्षेत्रवाढ मोहिमेत मका पिकाचे ३,७५८.८० हेक्टर आणि मोहरीचे ६७.६० हेक्टर क्षेत्र नोंदविण्यात आले आहे. आगामी काळात मका लागवडीचा विस्तार करण्यावर कृषी विभागाने विशेष भर दिला असून, दरवर्षी ५,६०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील तीन वर्षांत हे क्षेत्र १६,८०० हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
डिजिटल शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाविस्तार ॲपचा ३१ टक्के शेतकऱ्यांनी वापर सुरू केला आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, पीक व्यवस्थापन, रोगनियंत्रण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होत आहे.
याशिवाय, शेतकरी उत्पादक कंपन्यांना एफपीओ सक्षम करण्यासाठी ४० एफपीओंना कृषी अवजारे बँक उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. या उपक्रमामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री कमी खर्चात उपलब्ध होऊन उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या विविध योजनांची ही यशस्वी अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि कृषीपूरक उद्योगांना चालना देणे या उद्देशाने आगामी काळातही अधिक प्रभावीपणे योजना राबविण्याचा निर्धार कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
News - Gondia




Petrol Price




