रस्त्याअभावी गर्भवतीचा दीड किलोमीटर स्ट्रेचरवर प्रवास : कोईदूळमधील घटनेने आरोग्य व्यवस्थेचे वास्तव पुन्हा उघड


- कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाची धडपड; सुखरूप प्रसूती, माता-बाल सुरक्षित
विदर्भ न्यूज एक्सरेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (गडचिरोली) : दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा समोर आले आहे. तालुक्यातील कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील कोईदूळ गावात रस्त्याअभावी गर्भवती महिलेला तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून वाहून रुग्णवाहिकेपर्यंत आणावे लागले. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि पायाभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
२० जुलै रोजी सकाळी कोईदूळ येथील पुष्पा सुनील परसा ३० वर्षे यांना प्रसूतीकळा सुरू झाल्याची माहिती मिळताच कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी तातडीने गावात पोहोचले. मात्र, गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने आणि वाटेत नाला असल्यामुळे रुग्णवाहिका थेट गावात जाऊ शकली नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी गर्भवतीला स्ट्रेचरवर झोपवून सुमारे दीड किलोमीटरचा खडतर व चिखलमय मार्ग पार करत रुग्णवाहिकेपर्यंत आणले.
यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्यांना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची सुखरूप प्रसूती झाली असून त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पुढील उपचारासाठी माता आणि नवजात बालिकेला गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असून माता आणि बालक सुरक्षित असल्याने आरोग्य विभागासह कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गोटाटोलानंतर कोईदूळमध्येही तीच पुनरावृत्ती -
या घटनेने प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गोटाटोला गावातही अशाच प्रकारे रस्त्याअभावी गर्भवतीला स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ आली होती. त्या घटनेनंतरही प्रशासनाने आवश्यक उपाययोजना न केल्याने आता कोईदूळमध्ये पुन्हा त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती झाली आहे.
विशेष म्हणजे, एटापल्ली तालुका लोहखनिज संपत्तीमुळे राज्यासह देशभर चर्चेत असून या भागातून शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, याच तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये आजही नागरिकांना पक्क्या रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गर्भवती महिलेला उपचारासाठी रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून न्यावे लागणे ही विकासाच्या दाव्यांतील मोठी विसंगती असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पाच नाल्यांनी वेढलेली चार गावे; पावसाळ्यात तुटतो संपर्क -
कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोईदूळ, रेकनार, गडदापल्ली आणि गुंमडी ही चारही गावे जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल भागात आहेत. या गावांना जोडणारे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनते.
या गावांमधील नागरिकांना कसनसूर किंवा एटापल्ली येथे जाण्यासाठी दोन मोठे आणि तीन लहान असे एकूण पाच नाले पार करावे लागतात. मुसळधार पावसात हे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने या चारही गावांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी आरोग्य सेवा, शिक्षण, शासकीय सुविधा आणि दैनंदिन गरजांसाठीही ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
मूलभूत सुविधांची मागणी पुन्हा ऐरणीवर -
कोईदूळमधील या घटनेनंतर दुर्गम भागातील पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही कायमस्वरूपी रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. भविष्यात अशा जीवघेण्या परिस्थिती टाळण्यासाठी या भागातील रस्ते आणि नाल्यांवर कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




