भरधाव बसच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील डव्वा येथे भरधाव बसच्या धडकेत एका सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी १७ रात्री सुमारे ८.१५ वाजता घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी वाहतूक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव देवचंद भैयालाल भोंडे ५७ वर्षे, रा. चुडुरका असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोहमारा येथून गोंदियाच्या दिशेने जात असलेली एमएच-०९ ईएम-१८७० क्रमांकाची बस डव्वा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पोहोचली असता, सायकलवरून जात असलेल्या देवचंद भोंडे यांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, देवचंद भोंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
या प्रकरणी डुग्गीपार पोलीस अपघाताचे नेमके कारण, बसचालकाची भूमिका आणि इतर बाबींचा तपास करीत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे चुडुरका व डव्वा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या मार्गावरील भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
News - Gondia




Petrol Price




