महत्वाच्या बातम्या

 राजोली रेती घाटावरील हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार


- २४ तास उलटूनही पोलिसांना ठावठिकाणा नाही; सखोल चौकशीची माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील राजोली रेती घाटावर घडलेल्या युवकाच्या निघृण हत्या प्रकरणातील आरोपीचा २४ तासांहून अधिक काळ उलटूनही पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही. या प्रकरणात मृत आणि आरोपी दोघेही अवघ्या १८ वर्षांचे असल्याने अल्पवयीन वयातील युवकांकडून रेती वाहतुकीचे काम कोण करून घेत होते, तसेच या हत्येमागील नेमके कारण काय, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

राजोली रेती घाटावर १४ जुलैच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. मार्कस सुनील मेश्राम १८ वर्षे रा. तिरखुडा, ता. उमरेड, जि. नागपूर) हा रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर क्लिनर म्हणून काम करत होता. त्याची चालक विशाल प्रदीप महाकाळकर  १८ वर्षे रा. नागपूर याने गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्येनंतर आरोपीने मृतदेह झाडावर आडवा ठेवून घटनास्थळावरून पलायन केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असली तरी वृत्त लिहिपर्यंत त्याला अटक करण्यात यश आलेले नव्हते.

तपास केवळ आरोपीपुरता मर्यादित न ठेवण्याची मागणी -
या प्रकरणाचा तपास केवळ आरोपीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण रेती घाटावरील कार्यपद्धतीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

रेती घाटाचा मालक, भागीदार, घटनेच्या वेळी उपस्थित असलेले कर्मचारी, सुरक्षा रक्षक, वाहनचालक तसेच संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय, रेती घाटावरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का, याची पडताळणी करून त्यातील सर्व फुटेज तातडीने जप्त करण्यात यावेत. या फुटेजची फॉरेन्सिक तपासणी करून प्रत्यक्ष आरोपी तसेच त्याला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा -
या प्रकरणाचा निष्पक्ष, सर्वंकष आणि वेगवान तपास करून सत्य बाहेर आणावे. अन्यथा जनतेच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos